आपल्या मनःस्थितीची नोंद
निरनिराळ्या कारणांमुळे माणसाची मनःस्थिती सतत बदलत राहते. या बदलत राहणार्या मनःस्थितीची नोंद जर आपण ठेवू शकलो, तर त्यातून आपणास आपल्या आयुष्याचे आत्मपरिक्षण करता येऊ शकेल. अशाने जीवनात एक चांगला बदल घडवण्याची संधी उपलब्ध होईल.
Daylo या स्मार्टफोनवरील अनुप्रयोगाच्या सहाय्याने आपणास आपल्या मनःस्थितीची व्यवस्थित नोंद करुन ठेवता येते. चित्रात दाखवल्याप्रमाणे या अनुप्रयोगात पाच प्रकारच्या मनःस्थिती दर्शवण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी एकाची आपणास निवड करता येईल. सोबतच त्याक्षणी ‘आपण काय करत आहात?’ हे देखील आपणास या अनुप्रयोगात नोंदवता येईल.
या अनुप्रयोगास PINच्या सहाय्याने कुलूप लावता येते आणि यातील आपल्या नोंदींचा गुगल ड्राईव्हवर बॅकअप देखील घेता येतो. आपण हा अनुप्रयोग काहीकाळ नियमितपणे वापरल्यास आपल्या एकंदरित मनःस्थितीची आकडेवारी हा अनुप्रयोग आपणास सादर करु शकेल. दैनंदिनी लिहिणे हे अनेकांसाठी कठीण काम असले, तरी अशाप्रकारच्या अनुप्रयोगांच्या सहाय्याने आपली स्वतःची अशी एक दैनंदिनी सहजगत्या तयार होऊ शकते.











