विद्यावृत - माहे मार्च/एप्रिल २०२०
संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी जि नांदेड
-----------------------------------------------------------------------------------------------------
विज्ञान जत्रेत बालवैज्ञानिकांचा उत्साह- प्रकल्प सादरीकरणातून संशोधनवृतीची अनुभूति
विज्ञान हा एक असा दिवा आहे की जो कुठेही पेटवल्यावर ज्ञानाचा प्रकाश पसरतो. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला संधी मिळाल्यास कल्पना आणि जिज्ञासू वृतीमधून नवनिर्मिती कशी होते, हे क्षेत्रिय बालविज्ञान जत्रेतून दिसून आले. संस्थेच्या हीरक महोत्सव वर्षानिमित नांदेड जिल्ह्यातील बालवैज्ञानिकांसाठी दि. ६ फेब्रूवारी रोजी विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील पन्नासहून अधिक शाळेतील बालवैज्ञानिक आणि मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या प्रकल्पाची मांडणी केली. प्राथमिक गटातून 'इकोफ्रेंडली मल्टीयुजेबल अॅग्रिकल्चरल मशीन’ 'पावसाच्या पाण्याचे जलसिंचन' 'पाण्याची आद्रर्ता ओळखणे' माध्यमिक गटातून 'स्मार्ट होम प्रकल्प' 'स्मार्ट ब्लाईंड स्टीक प्रकल्प' 'आयुर्वेदिक बाम' या प्रकल्पाची निवड झाली. या विज्ञान जत्रेत संस्थेच्या प्राथमिक, शिवाजी हायस्कूल, सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ऍक्टिव्ह बेस्ड टिचिंग अँड लर्निंग या ABTL. अंतर्गत विविध शैक्षणिक साहित्य निर्मितीची मांडणी या विज्ञान प्रदर्शनात केली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बालविज्ञान जत्रेतील विजेत्या बालवैज्ञानिकांचे बक्षीस वितरण करण्यात आले. क्षेत्रिय बालविज्ञान जत्रेचे उद्घाटन हैदराबादच्या कार्टेल इंजिनियर प्रा.लि.चे संचालक सुरेश पटवर्धन व हयुव्हेल लाईफ सायन्सेस प्रा.लि.चे संचालक डॉ.शिशीर कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी मराठी विज्ञान परिषदेचे सदस्य डॉ.शंभुनाथ कहाळेकर, डॉ.योगेश जोशी, चंद्र्कांत जोशी, चेअरमन प्रमोद देशमुख यांची उपस्थिती होती.यावेळी विद्यार्थी शिक्षक आणि सहभागी बालवैज्ञानिकांची उपस्थिती होती.
माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन उत्साहात....
कुठे गळाभेट तर कुठे आनंदाश्रू... माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावनांना केली मोकळी वाट....
अनेक वर्षानंतर मित्र व गुरुजांना भेटल्यानंतर शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देणाऱ्या गप्पांचे नुसते कल्पनाचित्र उभे केल्यास कसे वाटेल... येथे त्याचा प्रत्यक्ष अनुभव अनेकांना घेता आला. संस्थेने हीरक महोत्सवी वर्षानिमित्त दि.८ फेब्रुवारी रोजी माजी विद्यार्थी व कार्यकर्त्याचे भव्य स्नेहमिलन आयोजित केले होते. यावेळी अनेक वर्षानंतर प्रिय मित्र व गुरुजी भेटल्यानंतर कुठे गळाभेट तर कुठे आनंदाश्रू व गप्पांच्या मैफिलींचे दृश्य दिसत होते. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त होत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. या स्नेहमिलन कार्यक्रमात अनेक विद्यार्थी एकमेकांना शालेय जीवनानंतर प्रथमच भेटले.अध्यक्षीय समारोपात प्रशालेचे प्रथम विद्यार्थी तथा संस्थेचे माजी कार्यकर्ते दत्ताराम खिरप्पा यांनी, कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या प्रयत्न आणि परिश्रमच्या त्यागातूनच ही संस्था लौकिकास आली. सगरोळी व पंचक्रोशीतील मुलांना संजीवनी देणारी ही संस्था आज खूप मोठे कार्य करीत असल्याने अभिमान वाटतो असे गौरोद्गर काढले. या स्नेह मेळाव्यास मागील ६० वर्षातील हजारो माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
हीरक महोत्सव सांगता समारोह
संस्थेस साठ वर्ष पूर्ण झाल्याने गतवर्ष विविध उपक्रमांनी साजरे झाले. दि.८ फेब्रुवारी रोजी हीरक महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष प. पू. श्रद्धेय डॉ. ज्ञानराज माणिकप्रभु महाराज होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.अशोक चव्हाण व खासदार विनय सहस्रबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार रावसाहेब अंतापूरकर, माजी आमदार सुभाष साबणे, नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, सरपंच सौ. सुजाता सिदनोड, संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख, हीरक महोत्सव समितीची अध्यक्ष अरविंद देशमुख आदींची उपस्थिती होती.
कुठलीही दळनवळणाची साधने नसताना सगरोळीसारख्या ग्रामीण भागात ६० वर्षापूर्वी शैक्षणिक संस्था स्थापन करणे याचा विचार करणेही कठीण होते. परंतु कर्मयोगी बाबासाहेबांनी १९५९ साली संस्कृति संवर्धन मंडळाची स्थापना करून छोट्याश्या झोपडीत शाळा सुरु केली हे त्यांचे मोठे धाडसाचे काम होते. शिक्षणाचा व्यवसाय न बनवता समाजाच्या उन्नतीसाठी हे शिक्षणाचे पवित्र कार्य निरंतरपणे चालू आहे याचा अभिमान वाटतो. संस्थेचे कार्य आदर्शवत असून समाजाला दिशा देण्याच कार्य करीत आहे. सरकारचा प्रतिनिधी म्हणून नेहमी संस्थेच्या पाठीशी राहील अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालक मंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली.
खूप दिवसांपासून सगरोळीच्या संस्थेची भेट घेण्याची इच्छा होती. हीरक महोत्सवी सांगता समारोह कार्यक्रमामुळे योग जुळून आला. ग्रामीण विकासात महिलांची मोलाची भूमिका आहे. हि संस्था शिक्षणासह महिला सक्षमीकरनाचे कार्य करीत आहेच. यापुढे अधिकाधिक ग्रामीण महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करावा. तरुणांना व्यावसायिक शिक्षणातून रोजगार मिळवून देण्यासाठी येथे सुरु असलेले उपक्रम स्तुत्य आहेत असे गोरोद्गार खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी काढले.
कर्मयोगी बाबासाहेबांनी सर्वसामान्यांना आधार देण्याचे महान कार्य केले आहे. समाजाचं आपण काहीतरी देणे लागतो. जे समाजाचे आहे ते समाजासाठी आनंदाने व प्रामाणिकपणे देण्याचे कार्य मागील ६० वर्षापासून संस्था अखंडपणे करीत आहे. डॉ. ज्ञानराज माणिकप्रभू महाराज आपल्या अध्यक्षीय आशीर्वादपर भाषणात म्हणाले.
प्रास्ताविकेत संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख यांनी, पैशांचा संचय न करता सद्गुणी व प्रामाणिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संचय करावा असे नेहमी बाबासाहेब म्हणत. त्यांच्या या विचारांनीच आज अनेक संस्था कायकर्ते, पंचक्रोशीतील माणसे जोडली गेली आहेत. त्यांच्या विश्वासावरच संस्था यशस्वी वाटचाल करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुकुंद महाराज तर आभार गंगाधर जाधव यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास संस्थेचे माजी विद्यार्थी ग्रामस्थ, पालक, हितचिंतक मोठ्या संखेने उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सव....
दररोज हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती... कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते उदघाटन
दरवर्षी प्रमाणे संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे दि. ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवन यांच्या हस्ते झाले. यादरम्यान अनेक कृषी क्षेत्रातील तज्ञ व यशस्वी शेतकऱ्यांनी फायदेशीर शेतीचा कानमंत्र दिला. तर कृषी विज्ञान केंद्राने प्रक्षेत्रावर मांडणी केलेल्या प्रयोगाची शिदोरी शेतकरी घेऊन गेले. उद्घाटन प्रसंगी कुलगुरू यांनी, पारंपरिक शेतीत बदल करुन भाजीपाला, फळबागा या मिश्र पिकांसह शेळीपालन,मत्स्यपालन, कुक्कुटपालन, रेशीमशेती, मधुमक्षिका पालन, दुग्धव्यवसाय, अशा कृषिपुरक व्यवसायासह एकात्मिक शेती करावी असे प्रतिपादन केले. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनि पोषक परसबागेची निर्मिती करावी. आर्थिक प्राप्तीसह आरोग्यसंवर्धक होईल. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान निवडीचे पर्याय उपलब्ध होत आहेत असे भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ATARI)चे संचालक डॉ. लखनसिंग म्हणाले. येथील कृषी तंत्रज्ञान महोत्सव शेतकऱ्यांसाठी एक पर्वणी असल्याचे जिल्हा कृषि अधीक्षक रविशंकर चलवदे म्हणाले. डॉ. धनंजय परकाळे यांनी पशुसंवर्धनासाठी शासनाच्या योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन पशुपालन व्यवसाय करावा असे आवाहन केले.
कृषी तंत्रज्ञान महोत्सवातील लक्षवेधी कार्यक्रम... यशस्वी उद्योजीका सावित्रींच्या लेकीचा सन्मान...
दि. १० रोजी सावित्रींच्या लेकींनी बचत गटांच्या माध्यमातून उभारलेल्या व्यवसायाची यशोगाथा महिला मेळाव्यात उपस्थित महिलांसमोर मांडण्यात आली.
कामगार ते यशस्वी उद्योजिका हा प्रवास करणाऱ्या कमलाताई परदेशी यांनी, कोणतेही काम हलके नसते, एकजुटीने कार्य केल्यास यश नक्कीच मिळते. व्यावसायिकतेला एकतेची जोड देऊन ते अधिक गतिमान करता येऊ शकते हा स्वतःचा अनुभव विषद केला. अंबिका मासालेच्या माध्यमातून विविध प्रकारची मसाले देश विदेशात विक्री केली जातात. दहा महिलांपासून सुरु झालेला या व्यवसात दोनशे महिला कार्यरत असून आज वर्षाकाठी सहा कोटीची उलाढाल होत असल्याचे त्यांनी सांगितले. अभिनेत्री मेघनाताई झुझाम यांनी आपल्या एकपात्री प्रयोगातून सावित्रीबाई फुलेंचा जीवनप्रवास उलगडत प्रबोधनातून मुलींच्या उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी राजेश धुर्वे यांनी, महिला स्वयं सहाय्यता गटांसाठी नाबार्डच्या विविध योजनेची माहिती दिली. यावेळी महिला बचत गट व यशस्वी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुणे येथील धन्वंतरी प्रतिष्ठानच्या श्रीमती प्रेरणा देशमुख यांनी महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व नांदेड जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते यशस्वी महिला उद्योजिकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
महोत्सवात बहरली खाऊ गल्ली... बचतगटांना मिळाले व्यासपीठ
भेळ, पाणीपुरी, ब्रेड पकोडा, वडापाव, पावभाजी. गुलाब व आवळा शरबत, दही धपाटा, मशरूम पकोडे, पापड, लोणचे, विविध प्रकारचे मसाले, अगरबत्ती यासह घोंगडे, गोदड्या व गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलवर महिला व बच्चे कंपनींनी मोठी गर्दी केल्याने महोत्सवात खाद्य संस्कृति बहरली होती.
जिल्ह्यातील महिला बचत गटांना व्यासपीठ, त्यांच्या उत्पादनांची विक्री व प्रचार प्रसार व्हावा, बचत गटांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी खाद्य संस्कृतीचे आयोजन केले होते. यामध्ये जिल्ह्यातील पन्नासहून अधिक बचत गट यासह अनेक महिलांनी आपापली उत्पादने या खाद्य संस्कृतीत मांडली होती. या महोत्सवात व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने उद्योजक महिलांनी समाधान व्यक्त केले. महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, डीआरडी, धान फाउंडेशन, महिला व बालकल्याण विभाग, आत्मा व शिक्षण मंडळ यांच्या अंतर्गत असलेल्या अनेक बचत गटांनी या महोत्सवात सहभाग नोंदविला होता.
ग्रामीण कुटुंबाच्या निरामय जीवनासाठी गंगम्मा मंडल पोषणबाग... (न्यूट्रीशियन गार्डन) शेतकऱ्यांची पसंती...
निरामय जीवनासाठी विषमुक्त अन्न सेवन हा एकमेव पर्याय असून नैसर्गिक तथा सेंद्रिय पद्धतीने कुटुंबापुरते शेतात किंवा घराशेजारी मोकळ्या जागेत 'गंगम्मा पोषणबाग' विकसित करून ताजा व सकस भाजीपाला सेवन केल्यास आर्थिक बचत होऊन निरोगी जीवन जगता येऊ शकते. याकरिता ३० फुट गोलाकार जागेवर गंगम्मा पोषणबागेचे प्रात्यक्षिक करण्यात आले होते. कृषी तंत्रज्ञान महोत्सवात हे मॉडेल शेतकऱ्यांचे आकर्षण ठरले. ह्या पोषण बागेत मेथी, पालक, गाजर, टोमॅटो, मोहरी, वांगे, भगर, मिरची, मुळा, बीट, पानकोबी, राजगीरा, कांदा, फुलकोबी, मका, शेपू, भेंडी, कोथिंबीर, गवार, काकडी, हळद, दोडका, औरा, कारला अशा ऐकून २२ प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या, वेलवर्गीय व कंदमूळवर्गीय भाजीपाला घेण्यात आला. या प्रकारच्या भाजीपाला घरच्या घरी सांडपाणी, टाकाऊ अन्न व ओला कचरा, शेणखत याचा उपयोग करून पिकवावा. या भाजीपाला सेवनातून रक्तशय कमी करण्यासाठी लागणाऱ्या लोह आणि फोलिक असिडयुक्त भाजीपाला दररोज मिळतो. शरीराला लागणाऱ्या कॅल्शीयम व इतर खनिज, जीवनसत्वे यांची गरज पूर्ण होते. महिलांमध्ये रक्तातील तांबड्या पेशी म्हणजे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते तर हाडांचा ठीसुळपणा आढळून येतो. ह्या पोषणबागेतील ह्या भाजीपाला सेवन केल्यास शरीरास लागणाऱ्या सर्व प्रकारच्या जीवनसत्वांची गरज पूर्ण होते. ह्या पोषणबागेतून कुटुंबाला पुरेसा भाजीपाला प्राप्त होऊन अधिकचा भाजीपाला विक्रीही करता येऊ शकतो त्यामुळे दवाखान्याला लागणारा खर्च व भाजीपाल्यातून मिळणारे उत्पन्न पाहता कुटुंबाचे आर्थिक स्त्रोतहि हि पोषणबाग बनू शकते, फक्त गरज आहे ती शेतकऱ्यांनी अवलंब करण्याची. निरोगी ग्रामीण जीवन यासाठीच महोत्सवात ह्या गंगम्मा मंडल पोषणबागेचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसमोर ठेवले होते. तेलंगणातील गंगम्मा नावाच्या महिलेने आपल्या घराच्या अंगणात अशी बाग विकसित केली म्हणून त्यास गंगम्मा तर गोलाकार असल्याने मंडल असे संबोधले गेल्याने त्यास 'गंगम्मा मंडल' पोषणबाग असे नाव पडले.
तंत्रज्ञान महोत्सवात शेतकऱ्यांना रायपूरच्या एक किलो पेरुची ओळख.
रायपुर येथील व्ही.एन.आर. नर्सरीने विकसित केलेले बीटी पेरूचे वाण महोत्सवात शेतकऱ्यांना अवलोकनार्थ उपलब्ध केले होते. एक किलोचे हे पेरू पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. शेतकऱ्यांनी पारंपारिक पिक पद्धतीसोबतच फळबाग लागवड करावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून महोत्सवात अशा विविध नवीन वाणाची ओळख करून दिली जाते.
बदलत्या हवामानास अनुकूल तंत्रज्ञानावर आधारित पिक प्रात्याक्षिके....
पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूवर आधारित शेतीपद्धती अवलंबून आहे. परंतु हवामानाच्या अनिश्चीतीतेमुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. ह्यावर उपाययोजना म्हणून हवामानास अनुकूल तंत्रज्ञानावर आधारित पीक पद्धतीसाठी या महोत्सवात प्रात्याक्षिके सादर केली होती.
एक एकर प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून अनिश्चित पाउस मानासाठी पर्यायी आपत्कालीन पिक योजना, त्यामध्ये हवामान अनुकूल वाणाचा वापर व कमी कालावधी, कीड व रोग प्रतिकारक, पाण्याचा ताण सहन करणारे वाण, उतारला आडवी मशागत व पेरणी, रुंद वरंबा सरी यंत्राने (बी.बी.एफ.) पेरणी, आंतरपीक पद्धती, शून्य मशागत लागवड, प्लास्टिक व शेतातील टाकाऊ काडी कचऱ्यापासून मलचिंग तंत्रज्ञानाचा वापर हिरवळीच्या खतांचा वापर, भूसुधारकाचा वापर, कीड नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन, माती परीक्षणावर आधारित एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, तुषार व ठिबक अशा सूक्ष्म सिंचनाचा वापर, रोग व किडींच्या संरक्षणापासून बीज प्रक्रिया, जल व मृद संधारनासाठी पिकात ठराविक ओळीनंतर सरी काढणे, संरक्षित सिंचनासाठी शेत तळ्याचा वापर, एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब म्हणजे कृषी पूरक उद्योग असे ऐकून १६ तंत्रज्ञानावर आधारित प्रात्याक्षिके प्रत्यक्ष शेतावर केली होती.
महाराष्ट्र कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी, निसर्गाच्या लहरीपणामुळे कोणत्याही प्रकारच्या पिकांचे खात्रीलायक उत्पन्न मिळणे कठीण झाले आहे. शेतीमालास हमीभाव मिळाला तरच शेतकरी जगेल असे प्रखरपणे आपली भावना व्यक्त केली. संस्थेच्या कृषि विज्ञान केंद्राचे कार्य हे शेतकऱ्यांना आधार देणारे असून कृषि तंत्रज्ञानाचा आधार घेत शेती करावी असे आवाहन केले. यावेळी राष्ट्रीय बांबू अभियान मराठवाडा विभागाचे समन्वय श्री भालेकर यांनी टिशूकल्चरच्या रोपांपासून केलेली बांबूची लागवड फायदेशीर आहे. बांबू हे बहुउपयोगी वनस्पती असून त्याचा वापर मोठया प्रमाणात केला जात आहे. कमी पाण्यावर होणारी बांबूची शेती शेतकऱ्यांनी करण्याचे आवाहन केले. प्रगतशील शेतकरी विनोद पाटील यांनी लिंबू, सीताफळ, पेरू,फळबाग शेती करून आर्थिक प्रबळता मिळवीता येते हे प्रत्यक्ष स्वअनुभवातून आलेले अनुभव शेतकऱ्यांसोबत कथन केले. कांदा एक फायदेशीर शेती याविषयी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कांदा उत्पादक शेतकरी उद्धवराव खेडकर यांनी, कांदा हे हमखास उत्पन्न देणारे पीक असून कमी पाण्यावर, कमी उत्पादन खर्च व कमी कालावधीचे पीक असल्याने कांदा लागवडीसचे आवाहन केले.
नेदरलँडची 'एरीस' आंतरराष्ट्रीय संस्था व कृषी विज्ञान केंद्रामध्ये सामंजस्य करार...
वातावरण बदलाचा शेतीवर होत असलेला अनिष्ट परिणाम लक्षात घेऊन कृषीपूरक उद्योगाला चालना देण्यासाठी संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे देशातील निवडक शेतकऱ्यांसाठी नेदरलँडच्या 'एरिस' या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेमार्फत ब्रॉयलर संगोपनावरील व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील दि. १७ ते २८ फेब्रुवारी दरम्यान दहा दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण झाले. यावेळी 'एरीस' व कृषी विज्ञान केंद्रामध्ये सामंजस्य करार झाला असून, संस्कृति संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख व नेदरलँडच्या 'एरीस' संस्थेचे प्रशिक्षक तथा प्रतिनिधी हेलमीक व्हॅन रइस यांनी करारावरती स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी एरिस संस्थेच्या अॅन एस्पेल, भारतातील प्रशिक्षण प्रतिनिधी श्रीमती डॉ. तरन्नुम कादरभाई, सगरोळीच्या सरपंच सौ. सुजताताई सिद्नोड, जेष्ठ नागरिक देविदासराव देशमुख, कृषी विज्ञान केंद्रात्तील शास्त्रज्ञ व शेतकरी उपस्थित होते. यापुढे ह्या दोन संस्था एकत्रितपणे शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्रॉयलर संगोपनावरील व्यावसायिक प्रशिक्षण तथा इतर माहिती आदानप्रदान करणार आहेत.
'एरीस' या संस्थेतर्फे शेतकऱ्यांना कुकुटपालन व्यवसायासाठी उपयुक्त असे ज्ञान दिले जाईल अशी शिक्षण, प्रशिक्षण व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. जगातील सर्वच शेतकऱ्यांना या व्यवसायाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी 'एरिस' संस्था सन १९७० पासून अंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण देते.
'एरीस' ट्रेनिंग सेंटरतर्फे कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांना व निवडक शेतकऱ्यांना दरवर्षी नेदरलँड् येथे अद्यावत प्रशिक्षण मिळणार. प्रशिक्षण घेतलेले शास्त्रज्ञ व शेतकरी भारतातील इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतील. कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यकर्त्यांना प्राधान्याने शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न असेल. व्हिडीओ कॉन्फरनसिंगद्वारे वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल, जगातील इतर देशात असलेल्या 'एरीस' च्या संबंधित संस्थांबरोबर शिक्षण, कृषी व पशु कल्याण याविषयावर माहितीचे आदानप्रदान होईल. संस्थेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनाही संधी उपलब्ध होईल. व्यावसायिक कुकुटपालनास चालना देण्यासाठी दोन्ही संस्था विविध उपक्रम हाती घेतील. सगरोळीसारख्या भागात प्रशिक्षण देण्याची संधी आम्हाला कृषी विज्ञान केंद्रामुळे प्राप्त झाली. 'एरीस' प्रात्यक्षिकावर आधारित प्रशिक्षण देणारी संस्था आहे. प्रशिक्षणाचा फायदा शेतकऱ्यांनी घेतल्यास अधिक आनंद होतो. हा झालेला करार आमच्यासाठी समाधानकारक असून, येथे प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या अनुभावरून ह्या दोन संस्थेत शेतकऱ्यांसाठी काम करण्याकरिता मोठा वाव असल्याचे हेलमिक म्हणाले. हा करारनामा नसून सहनामा आहे. ग्रामीण भागातील लोकांसाठी कार्य करणार आहोत. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे हस्तांतरण होणार आहे. कुकुटपालन व्यवसायातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी आता नेदरलँड येथे पाठवता येईल. असे संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख यांनी सांगितले.
बालकांचे हक्क याविषयी तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न
UNRCR सेंट्रल फॉर सोशल एकॅशन मुंबई येथील प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील शिक्षक, गृहपाल, पर्यवेक्षक, यांच्यासाठी दि.२७ ते २९ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेतून मुलांना स्वहक्काची जाणीव करून देणे, मुलांच्या जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव, मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न, शासकीय स्तरावरील उपक्रमात नेतृत्व विकासाची संधी मिळवून देणे, एकजूट होऊन शासकीय यंत्रणेत सहभाग घेणे, यासोबतच मुलांशी संवाद, त्यांच्या गरजा, त्यांच्या समस्या व प्रश्न शासन स्तरावर सोडविणे. बालसंसद ही पूर्णतः मुलांच्या सहभागावर आधारित असून यामध्ये ०६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा प्रामुख्याने सहभाग असून बालसभेच्या माध्यमातून कौशल्य विकास, गट संघटन, भविष्यातील समाजाचे जबाबदार नागरिक घडविण्यासाठी बालसंसद कार्य करत आहे.
वरोरा येथील जोडो-भारत राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत खेळाडूंचे यश..
दि.९ फेब्रुवारी रोजी आनंदवन-वरोरा (जि.चंद्रपूर) येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत संस्थेतील खेळाडूंनी घवघवीत यश मिळविले. महाराष्ट्र अॅथलेटीक्स संघटना व चंद्रपूर जिल्हा अॅथलेटीक्स संघटना संलग्नित श्रद्धेय बाबा आमटे स्मृती निमित्त महारोगी सेवा समिती, वरोरा आनंदवन द्वारा भव्य राज्यस्तरीय जोडो भारत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ५ किमी, १० किमी व २१ किमी या विविध प्रकारात सगरोळीच्या ऐकून ७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. पाच किमी धावणे स्पर्धेत सचिन पवार याने १५ मिनिट १७ सेकंदात स्पर्धा पूर्ण करून दुसरा क्रमांक मिळविला तर विष्णू लव्हाळे याने १० किमीची स्पर्धा ३३ मिनिट १३ सेकंदात पूर्ण करून दुसरा क्रमांक मिळविला इतर कृष्णा भालेवर ५ किमी, साईनाथ उस्केलवार ५ किमी, अनिल तर्फेवार २१ किमी, राजुरे इरवंत २१ किमी, व मारोती वडजे १० किमी. या खेळाडूंनीहि समाधानकारक यश मिळविले. पूज्य बाबा आमटे यांच्या कुटुंबीयांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव, क्रीडाप्रेमींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
नेदरलॅंडमधील शिक्षक जोहान्स व अॅन रमले शाळेत....
विद्यार्थ्यांशी साधला संवाद व कृतियुक्त शिक्षण पद्धतीचे केले कौतुक.
नेदरलॅंडच्या जोहान्स इनटी हॉल व अॅन वांडर्स या शिक्षकांनी संस्थेच्या शाळेला भेट दिली. एक दोन नव्हे तर तब्बल दहा दिवस ते विद्यार्थ्यांसोबत रमले. यादरम्यान त्यांनी वर्ग भेटी, विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधून येथे चालू असलेल्या (ए.बी.टी.एल) अॅक्टीव्हिटी बेसड् टीचिंग लर्निंग म्हणजे कृतियुक्त शिक्षण पद्धतीचे कौतुक केले तर विद्यार्थ्यांचा वर्गहि घेतला.
जोहान्स इनटी हॉल हे नेदरलॅंडच्या अॅन्हेम या शहरातील अॅनेंथीन कॉलेजमध्ये गणित विषयाचे शिक्षक आहेत. तर अॅना वांडर्स या महिला शिक्षीका केस्टर्न शहरातील हेलीकॉन ऑप्लीडींजर ह्या शाळेत कृषी व्यवसाय हा विषय शिकवितात. या दोघांनीही शिवाजी हायस्कूल, शिवाजी ज्युनिअर बेसिक स्कूल, सैनिकी विद्यालय व मिलेनिअम इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत संस्थेतील सायन्स पार्क, अटल टिंकरिंग लॅब, झेस्ट, स्पीकवेल, मेवा, इक्विप, सील या शैक्षणिक उपक्रमांची तर सगरोळी सनराइज क्रीडा प्रकल्पाची माहिती घेतली. यादरम्यान त्यांनी दोन्ही देशातील शिक्षण पद्धतीची देवान घेवाण केली.
सगरोळीच्या शाळेतील शिक्षण पद्धतीत केले जाणारे विविध प्रयोग अद्यावत असून आधुनिक जगाचे आव्हाने पेलणारे आहेत असे मनोगत ह्या शिक्षकांनी व्यक्त केले. शाळेच्या वेळानंतर ह्या परदेशी पाहुण्यांनी येथील शेती, बाजारपेठ, गावातील नागरिकांच्या भेटी व शेतकरी, व्यापाऱ्यांशी संवाद साधून येथील समाज जीवनाविषयी माहिती घेतली. येथील शाकाहारी पदार्थ खूप छान असून सोबत घेऊन जाणार असल्याचे ते म्हणाले. आम्हांला पुन्हा संधी मिळाली तर आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा येऊ म्हणत येथील विद्यार्थी आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत संस्थेच्या कार्याचा गौरव केला.
राज्यस्तरीय वॉटर आलिम्पियड स्पर्धेत सुयश .....
रोटरी वॉटर ऑलिम्पियाड२०२० ही राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा पुणे विद्यापीठाच्या वतीने दि.२३ फेब्रुवारी रोजी आयोजित केली होती. राज्यभरातून ५००० मुलांनी ही परीक्षा दिली. यामधून प्राथमिक गटातून १०, माध्यमिक गटातून १० मुलांनी यश संपादन करून प्रश्नमंजुषा मध्ये सहभागी झाले. यात प्राथमिक मधून कु. धनश्री राऊलवार तृतीय तर माध्यमिक गटातून वेदांत गिरगावकर चौथा क्रमांक पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले. संस्था आणि प्रशालेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
प्रशालेतील मुलींना सायकलचे वाटप.....
शासनाच्या मानव विकास योजनेअंतर्गत संस्थेच्या शिवाजी हायस्कूल मधील बाहेर गावाहून ये-जा करणाऱ्या ९ मुलींना सगरोळीच्या सरपंच सुजाताताई सिदनोड, संस्थेचे सचिव डॉ. जयंत जकाते यांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक, पालक यांची उपस्थिती होती.
संस्कार भारतीतर्फे रांगोळी आणि नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
संस्थेच्या सैनिकी विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिला व मुलींसाठी दि. ४ मार्च रोजी रांगोळी व नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. महिला हक्क आणि संस्कार हि काळाची गरज असल्याने या विषयी प्रमुख मर्गदर्शक सौ. स्नेहलताई पाठक यांनी माहिती दिली. गीताताई रावतोळे यांनी भू अलंकरण रांगोळी तर सुनीताताई घाटे यांनी नाट्य अभिनयाचे मार्गदर्शन केले.
व्यवसाय अभ्यासक्रमातील ४४ विद्यार्थ्यांची निवड
श्री छ. शिवाजी ज्युनिअर कॉलेज व्यवसाय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांकरिता विविध औद्योगिक कंपनीत नौकरीची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने दि.११ फेब्रुवारी रोजी भरती मेळावा आयोजित करण्यात आला. सगरोळी, नायगाव, देगलूर, भोकर परिसरातून ११६ विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यातील ४४ मुलांना नौकरीची संधी उपलब्ध झाली. मेटलमॅन ऑटो प्रा. ली., इंडोरन्स इंजिअरिंग, बिजी लिड्रं, औरंगाबाद इलेक्ट्ररीकल्स, धूत ट्रान्समिशन, वर्ल्ड वाईड पुणे, ऑईल फिल्ड मशिन प्रा. ली. या उद्योग समूहाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची निवड केली.
सूर्यनमस्कार व समूहगायन स्पर्धेत प्रशालेचे यश
मातृमंदिर विश्वस्त संस्थ निगडी, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या सूर्यनमस्कार, विद्यार्थी समूहगायन, अध्यापक समूहगायन स्पर्धेत संस्थेच्या प्राथमिक, शिवाजी हायस्कूल आणि सैनिकी विद्यालयाने सहभाग घेतला. मराठवाडा स्तरावरील सूर्यनमस्कार स्पर्धेत सैनिकी विद्यालय प्रथम, शिवाजी हायस्कूलने तिसरा क्रमांक मिळविला. विद्यार्थी समूहगायन स्पर्धेत शिवाजी हायस्कूल व्दितीय तर सैनिकी विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. शिवाजी ज्युनिअर बेसिक स्कूलला उतेजनार्थ गौरविण्यात आले. दि.९ फेब्रुवारी रोजी झालेल्या मातृमंदिर विश्वस्त संस्था निगडी यांच्यावतीने आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रमात संस्थेचे प्रतिनिधी मल्लखांब व सूर्यनमस्कार प्रशिक्षक विनोद वाघमारे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
छत्रपती शिवजन्मोत्सव हर्षोल्हासात साजरा
छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयाच्या वतीने शिवजन्मोत्सवा चा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते प्रा. विश्वाधार देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी मिलेनियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा तर प्राथमिक शाळेच्या मुलांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्र आधारित विविध प्रसंगातून सादरीकरण केले. शिवाजी हायस्कूलच्या कु. श्वेता तुकडे हिने शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची माहिती आपल्या प्रभावी वक्तृत्वातून कथन केले. सैनिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या कार्याचे गुणगान पोवाड्यातून सादर केले. प्रमुख वक्ते यांनी 'शिवरायांशी का आठवावे' या विषयी बोलतांना आपण आपली निष्ठा आणि नैतिकता जपून ती देशकार्यासाठी वर्तनातून आदर्श दाखवून देण्यासाठी दक्ष राहण्यास सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील देशमुख होते. यावेळीं विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
संकल्प दिन उत्साहात... 'क्षात्रतेज' वार्षिक अंकाचे विमोचन
संस्कृति संवर्धन मंडळ संस्थेचे संस्थापक पू. कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांचा जन्मदिन दरवर्षी 'संकल्प दिन' म्हणून साजरा केला जातो. दि. १५ मार्च रोजी झालेल्या या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ज्ञानप्रबोधिनी पुणे या संस्थेचे संचालक श्री गिरीष बापट, आणि विवेकानंद रुग्णालयाचे प्रमुख पदमभूषण डॉ.अशोकजी कुकडे उपस्थित होते. यावेळी सैनिकी विद्यालयाच्या 'क्षात्रतेज' वार्षीकांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात झाले.
कर्मयोगी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी संकल्प ठरविला जातो व तो पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते कटिबद्ध असतात. यावर्षी 'कार्याकार्त्यामधील व्यावसायिकता' हा संकल्प निश्चित केला असून ह्या विषयी गिरीष बापट यांनी, वेळेचे व्यवस्थापन, अचूक मोजमाप व कामाचे नियोजन करावे, ध्येय निश्चित ठेऊन उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयोगशीलता अंगीकारल्यास कार्यकर्त्यामध्ये व्यावसायीकता दृढ होण्यास मदत होईल. कर्मचारी आणि कार्यकर्ता यातील फरक सांगून जो निष्ठेने आणि एकाग्रतेने काम करतो तो कार्यकर्ता. अशा कार्यकर्त्याकडून असे संकल्प पूर्ण होणे हे समाज आणि राष्ट्र हिताचे असते म्हणून व्यावसायिकता जोपासण्यासाठी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यानी वेळ, पैसा आणि मेहनत आदींचे नियोजन करावे म्हणजे यश मिळण्यास फार वेळ लागणार नाही. चांगले ते घ्यावे व वाईट सोडावे, जे हवय त्याची निर्मिती केली पाहिजे त्यातून आनंद मिळतो. कमीत कमी पैशात व कष्टात उद्दिष्टांनुसार कार्याची पूर्तता केल्यास ती व्यावसायिक कृती ठरते. नवीन संकल्पना सुचाव्यात त्या अनुषंगाने विचार करावा. या माध्यमातूनच व्यावसायिक वृत्ती निर्माण होईल असे सांगितले. व्यसनाधीनता व त्याचे मानवी जीवनावर होत असलेले दुष्परिणाम या विषयी सांगताना डॉ. अशोक कुकडे यांनी मानवी शरीर हे सर्वात मौलिक संपत्ती असून सूर्यनमस्कार, योगा याद्वारे आपण आरोग्यमय जीवन व्यतीत करावा असा संदेश दिला. अध्यक्षीय समारोप प्रसंगी श्री देशमुख यांनी आपण केलेला संकल्प हा कार्यामधून व कृतीतून दाखवून देत त्यासाठी सातत्याने अधिक प्रयत्नशील राहुन कार्य करण्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिला. यावेळी विविध पुरस्कार प्राप्त झालेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते झाला.
श्रध्दा देशमुख महिला भूषण पुरस्काराने सन्मानित ...
सामाजिक क्षेत्रात विशेषतः महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या महिलांच्या कार्याची दखल घेऊन दरवर्षी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, दै. समीक्षा, पत्रप्रेस परिषद, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप व ह्युमन राईट्स फाउंडेशनतर्फे गेल्या दहा वर्षापासून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा जागतिक महिला दिनी दि.८ मार्च रोजी विशेष सन्मान केला जातो. संस्थेच्या उत्कर्ष अॅग्रो इंडिस्ट्रीजच्या संचालिका श्रद्धा देशमुख यांचा माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते कुसुमताई महिला भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. श्रद्धा देशमुख या उत्कर्ष अॅग्रो इंडिस्ट्रीद्वारे अन्न प्रक्रिया उद्योग व प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत. सोया दूध, पनीर, सीताफळ, आवळा, करवंद, कोरफड या पासून विविध उत्पादने व लोणचे, स्क्वॅश आदी पदार्थाची निर्मिती व महिलांना प्रशिक्षण देत आहेत. गृहउद्योग, मिरची पावडर, शेवगा पावडर, मसाले, डाळ निर्मिती, ब्युटीपार्लर, पाक कला, महिलांच्या आरोग्य विषयी शिबिरांचे आयोजन करून सक्षमीकरणासाठी मोलाची भूमिका पार पाडत आहेत.
काटकळंबा ता कंधार येथे क्षमता बांधणी टप्यास सुरुवात...
नाबार्ड व ॲटलास काॕपको चॕरिटेबल संस्था पुणे यांनी काटकळंबा ता.कंधार पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पास मान्यता दिल्यानंतर एप्रिल 2019 पासून मृद व जलसंधारणाचे विविध काम संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातुन हाती घेतले आहेत.यावर्षी नाबार्डने क्षमता बांधणी टप्यास मंजूरी दिली असून यात एकूण 100 हेक्टर क्षेत्रावर मृदसंधारणाची कामे प्रस्तावित आहेत यात सलग समतल चर ,खोल सलग समतल चर,गली प्लग बांधबंदिस्ती ,सांडवे तसेच वृक्षारोपण आदी कामांचा समावेश आहे.दि.24 एप्रिल 2020 रोजी प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे याप्रसंगी पाणालोट समितीचे अध्यक्ष श्री बाबुराव बस्वदे,बालाजी पानपट्टे,मोहन पवार उपसरपंच गोविंदराव वाकोरे,सरपंच प्रतिनिधी राष्ट्रपाल चावरे साईनाथ कोळगिरे,सुभाष मोरे,सदाशिव हाम्पले ,रामदास बस्वदे व तसेच पाणलोट समितीचे पदाधिकारी आणि संस्था प्रतिनिधी गंगाधर कानगुलवार ,व्यंकटी ढाले आदी उपस्थित होते.सध्या गट क्रमांक 167 व 166 या क्षेत्रावर सलग समतल चर,खोल सलग समतल चर आदी कामे मजूरांमार्फत प्रगतीपथावर आहेत.कोरोना महामारी लक्षात घेता मजूरांना कामे देतांना आवश्यक ती काळजी व खबरदारी घेतली जात आहे.लाॕकडाऊन कालावधीत गावातील स्थानिक मजूरांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाल्याने गावक-यांनी सामाधान व्यक्त केले आहे.क्षमता बांधणी टप्पा यशस्वीपणे पुर्ण झाल्यानंतर नाबार्ड मुख्य टप्यास मान्यता देणार आहे.सदरील प्रकल्प हा नाबार्डचा महत्वाकांक्षी प्रकल्प हवामानावर आधारित पाणलोट प्रकल्प असून बदलत्या हवामानाचा अभ्यास करुन शेतक-यांना पिक रचनेत पध्दतीत बदल करता येणार आहे.
विद्यार्थ्यांकडून ग्रंथदान....
संस्थेच्या सैनिकी विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा सोहळा संपन्न झाला. यावेळी विदार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी प्रशालेतील आपल्या लहान बांधवांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी दहा हजार रुपये किमतीचे स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास संदर्भीय व विविध ग्रंथ वसतिगृहास भेट देऊन वसतिगृहात ग्रंथालय सुरू करून नवा आदर्श निर्माण केला. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सगरोळी सनराईज क्रीडा प्रकल्पाचे मार्गदर्शक तथा मुंबई येथील उद्योजक दीपक कानेगावकर यांचे दि. २१ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे निधन झाले. सन २००३ साली कानेगावकर यांच्या मार्गदर्शनाने निवडक खेळाडूंसह सगरोळी सनराईज या क्रीडा प्रकल्पाची सुरुवात झाली. अठरा वर्षानंतरही हा प्रकल्प कानेगांवकर यांनी ठरवलेल्या उद्देशानुसार वाटचाल करीत आहे. अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय तथा अंतराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे येथील संस्थेत वर्गातील शिक्षणाएवढेच मैदानातील खेळांनाही महत्व प्राप्त झाले आहे. दर्जेदार प्रशिक्षण, योग्य आहार, प्रशिक्षांसाठी लागणारे साहित्य आदींची पूर्तता कानेगांवकर यांनी केली. त्यांच्या सोबत अनेक क्रीडाप्रेमी संस्थेशी जोडल्या गेले व आज दीपक कानेगांवकर यांच्यामुळेच संस्थेत स्वतंत्रपणे क्रीडा धोरण अंमलात आले आहे.
श्री. माधवराव गटणे यांचे पुणे येथे दि.२३ मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. संस्थेच्या बालकमंदिर वसतिगृहात ३२ वर्षे गृहपाल पदी कार्यरत होते. अत्यंत प्रामाणिक व निष्ठेने त्यांनी विद्यार्थ्यांची सेवा केली. हजारो निराधार व गरजू मुलांचा पित्याप्रमाणे त्यांनी सांभाळ केला. संस्थेने एक पितृतुल्य व्यक्तिमत्व गमावले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.
राष्ट्रीय खेळाडू व स्थलसेनेत २५ वर्षे देशसेवा केल्यानंतर नारायण आणेराव यांनी संस्थेत 'सगरोळी सनराईज या क्रीडा प्रकल्पाच्या मुख्य प्रशिक्षकाची धुरा सांभाळली. त्यांच्या मार्गदर्शनाने खेळाडूंनी अनेक स्पर्धा गाजवल्या. यामध्ये आणेराव यांची भूमिका महत्वाची होती. नारायण आणेराव यांचे दि. २५ मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. संस्था परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली...