सकाळीं पायीं फिरण्याचा फेरफटका आटपून अनंत घरी परतला, तेव्हां नाश्ता तयारच होता. नाश्ता संपवून त्याने बाल्कनीच्या दारासमोर खुर्ची ओढून घेतली आणि एकीकडे गरमागरम चहाचे घुटके घेत तो वर्तमानपत्रांतील बातम्यांच्या हेडलाईन्स पाहूं लागला. तेवढ्यांत बाजूलाच ठेवलेला मोबाईल वाजला.
येत असलेला काॅल कुणाचा पाहून तो घेत, कीचनमधे चहा-नाश्त्याची भांडी हातासरशी धुुवीत असलेल्या शुभदाला त्याने आवाज दिला,
"शुभदा, लौकर बाहेर ये. योगेशचा फोन आला आहे, तो मी स्पीकरवर टाकतोय्!"
"गुड माॅर्निंग, बाबा!" पलीकडून अभिवादन करीत योगेशने विचारलं, "आई जवळपास नाहींत कां?"
"अरे ती कीचनमधे आहे! येईलच इतक्यात. तुझा फोन आल्याचं मी तिला सांगीतलं आहे"
"तर मग आधी स्पीकर बंद करा, प्लीज!" योगेश घाईघाईने म्हणाला, "मला जे कांही सांगायचं आहे ते बोलून झाल्यावर स्पीकर पुन: ऑन करा!"
योगेशला आपल्या एकट्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे हे ओळखून अनंतने चट्कन स्पीकर बंद केला आणि मोबाईल कानाच्या अगदी जवळ नेऊन हलकेच म्हणाला ,
"केला बंद स्पीकर! आतां तूं सरळ बोलत रहा योगेश! शुभदा मधेच बाहेर आली तरी मी सांभाळून घेईन. आज जयूऐवजी तूं काॅल केलेला बघितल्यावरच वाटलं होतं की तुला तसंच महत्वाचं कांही बोलायचं असणार! काय विशेष?"
त्यानंतर जवळ-जवळ ५-७ मिनिटे योगेश अनंतशी दबत्या आवाजांत बोलत राहिला! त्यांत खंड पडला तो फक्त शुभदाच्या बाहेर येण्याने. ती आली तशी अनंत निर्विकार मुद्रेनं चुकचुकत तिला म्हणाला,
"कट झाला बहुतेक! पण योगेश पुन: लगेच करीलच. तोपर्यंत तूं कीचनमधे जे काय काम राहिलं आहे ते उरकून लगेच बाहेर येऊन बस;--म्हणजे पुन्हां ये-जा करायला नको!"
जे महत्वाचं सांगायचं होतं ते बोलून झाल्यावर योगेश म्हणाला,
"आतां हा काॅल कट करून मी पुन्हां नव्याने करतो, तेव्हां तुम्ही स्पीकर ऑन करा. म्हणजे चौघांनाही एकत्र बोलतां येईल! हो, जयश्रीही बाजूलाच आहे!"
दोनच मिनिटांत योगेशचा नव्याने फोन आला तेव्हां लगबगीने बाहेर येत शुभदा म्हणाली,
"आज योगेश फोन करतोय् म्हणजे नक्कीच कांहीतरी खास असणार!"
"योगेश, शुभदा आली आहे आणि फोनही स्पीकरवर आहे! तूं बोल आतां!"
"आई आणि बाबा, जयश्री माझ्या बाजूलाच बसली आहे! पण ती स्वत: ही खुशखबर सांगायला लाजते आहे, म्हणून मीच सांगतो! तुम्ही लौकरच आजी-आजोबा होणार आहांत!!"
अनंत आणि शुभदा चकीत झाल्यागत एकमेकांकडे बघतच राहिले! पण स्वत:ला चट्कन सांवरीत अनंतने दोघांचं उत्साहाने अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या तर शुभदा थरथरत्या आवाजांत उद्गारली,
"अग्गोबाई! खरंच की काय!" आनंदाच्या आवेगात तिला कांंही क्षण पुढे बोलायला सुधरेचना! आनंदाश्रूंनी डबडबलेले डोळे पुसत शुभदा मग म्हणाली,
"जयू, तूं आणि योगेश खोटं सांगणार नाहीं याची खात्री असली तरी, अजूनही जे ऐकलं त्यावर विश्वासच बसत नाहीं ग!"
"तसं होणं साहजिक असलं तरी योगेशने सांगीतलं ते १०० % खरं आहे, आई! आम्ही दोघांनीही डॉक्टरांकडून पक्की खात्री करून घेतल्यावरच तुम्हांला आज ही हवीहवीशी बातमी कळवली आहे!" एकीकडे स्वत:च्या आवाजावर ताबा ठेवायचे आटोकाट प्रयत्न करीत, पण तरीही भरल्या गळ्याने आईला आश्वस्त करीत जयश्री म्हणाली.
यावर काय बोलावं ते अनंत वा शुभदा दोघांनाही न सुचल्याने आणखी कांही क्षण अवघडल्या शांततेत गेल्यावर योगेश समजूतदारपणे म्हणाला,
"आई आणि बाबा, तुमच्यासाठी हा धक्का कितीही सुखद असला तरी आकस्मिक आणि अनपेक्षित आहे! त्यामुळे तुमच्या मनांत काय काय प्रश्न उपस्थित होतील याचा विचार करून मी तुमच्या विविध संभाव्य प्रश्नांची उत्तरे देणारी एक खुलासेवार मेल तयार केली आहे! बाबा, मी तुम्हांला ती लगेच पाठवतो. तुम्ही दोघांनी ती शांतपणे वाचा, समजून घ्या आणि विचार करा! मग आपण उद्यां सकाळी याच सुमारास त्याबद्दल शांत चित्ताने पुन: बोलुयां!"
खरं तर मेल वगैरे न पाठवतां योगेशने फोनवरच आवश्यक ते सर्व तपशील अनंतला समजावून सांगीतले होते! पण शुभदासमोर तर ठरल्यानुसार मेलचं लटकं नाटक करणं भाग होतं!
त्यासाठी अनंत बेडरूममधून आपला लॅपटॉप घेऊन आला आणि तो चार्जिगसाठी लावला. अजूनही किंकर्तव्यमूढ अवस्थेत असलेल्या शुभदाच्या जवळ बसत तिला ऐकूं जावं इतपत मोठ्या आवाजांत अनंत म्हणाला,
" १५-२० मिनिटांनी मेल चेक करून बघुयां योगेशने एवढा कसला खुलासा केला आहे!"
त्याच्या आवाजाने शुभदा खाडकन् भानावर आली! दोन्हीं भुंवयावरचा कपाळाचा भाग गच्च दाबून धरीत, खेदाने मान हलवीत ती म्हणाली,
" मला तर कांहीच सुधरत नाहींये! लग्नानंतर म्हणे दोघांनी विचारपूर्वक ठरवलं होतं की आपल्याला मूलच नको! पहिली ५-७ वर्षें मी दातांच्या कण्या केल्या की बाबांनो वेळच्या वेळी मूल व्हायला हवं! पण जयू म्हणजे मुलुखाची हट्टी, 'एकदां ठरवलं ते पक्कं' बाण्याची!! भरीस भर म्हणजे तिला योगेशची साथ! मग काय, एवढी वर्षं वायां घालवली आणि आतां चाळिशीच्या उंबरठ्यावर दोघे आई-बाबा व्हायला निघालेत! -- आणि वरातीमागून घोडी नाचायला हवीत तसे आपण आजी आणि आजोबा!"
शुभदाच्या अस्वस्थ मनाची घालमेल आणि चिडचिड लक्षांत येऊन तिला समजवायचा प्रयत्न करीत अनंत म्हणाला,
"शुभदा, आपण त्रागा करण्यांत काय अर्थ आहे? योगेश आणि जयू दोघेही चांगले शिकलेले आहेत, आपापल्या कार्यक्षेत्रांत झोकून देऊन काम करताहेत! म्हणजे दोघेही साधक-बाधक विचार करण्याएवढे सुजाण आणि सक्षम आहेत ना? मग त्यांनी एकमताने घेतलेल्या कुठल्याही निर्णयाला आपण विरोध कां करायचा? लग्नानंतर त्यांनी मुलांबद्दल घेतलेल्या निर्णयामागे त्यांची काही कारणं असतील मग भले ती आपल्याला पटोत वा न पटोत! -- आणि आतां जर तो निर्णय त्यांनी बदलला असेल तर त्याची कारणं आपण समजून तरी घ्यायला हवीत ना?"