मी ‘Mitch Albom’ चं ‘Tuesdays with Morrie’ पुस्तक वाचलं तेव्हा तसाच एक हाडाचा शिक्षक-माणूस मी माझ्या आयुष्यात अनुभवलाय म्हणून मला ते पुस्तक कळलं. नाही तर मला ती अतिशयोक्ती वाटली असती. किंवा आणखी एक शक्यता अशी कि, हे पुस्तक मी वाचलं म्हणून मला माझ्या आयुष्यातलं या माणसाचं महत्व कळलं. यंदा जवळ जवळ नऊ वर्षांनंतर मी त्यांना भेटले. गेली काही वर्षं मी मनापासून प्रयत्न करतेय कि मी त्यांच्याविषयी लिहावं, पण कधी ते जमलं नाही. ते बळ माझ्यात न्हवतं, पण आता आलंय बहुदा. त्यांना भेटून मला खूप गहिवरून आलं, फार बोलणं जमलं नाही. पण भेटण्याच्या समाधानानं मन पुरेपूर भरलं. ते तसेच होते, ९ वर्षांपूर्वीचे, बदल माझ्यात झालेला. गुरूचा शिष्य आता मोठा झालेला. ते एक खूप प्रभावी व्यक्तिमत्व आहे. पण त्यांचा प्रभाव ते कुठे दाखवून देत नाहीत. तो समोरच्याला स्वतःहून जाणवण्याची ते वाट पहातात. माझ्या बाबतीतही तेच झालं. मला त्यांचं महत्व, त्यांचा प्रभाव खूप उशिरा कळला. मला त्यांची किंमत न्हवती असं कधीच न्हवतं. पण फक्त किंमत आहे हे माहीत असून उपयोग नसतो, ती नेमकी किती आहे हे माहित असावं लागतं. आणि मी हे पुस्तक वाचलं तेव्हा ती किंमत लाख मोलाची आहे हे समजलं. त्या दरम्यान आमच्या वाटा वेगवेगळ्या झालेल्या होत्या. त्यांच्याकडून मी कित्ती काय काय शिकले हे मला उशिरा कळलं होतं, आणि तेव्हा परत नव्याने शिकणं, किंवा त्याची उजळणी करण किंवा नवीन काहीतरी शिकणं शक्य न्हवतं. आयुष्यातलं शाळा हे पुस्तक बंद होऊन ४-५ वर्षं उलटली तेव्हा मी हे पुस्तक- ‘Tuesdays with Morrie’ वाचलं. एका शिकवण्याचा ध्यास घेतलेल्या, हाडाच्या आणि मनाच्या शिक्षकाच्या आयुष्यातील शेवटच्या काही कालावधीतील ही गोष्ट आहे. त्यांच्या शेवटच्या course ची गोष्ट. आणि ती गोष्ट सांगणारा लेखक म्हणजे त्या शेवटच्या course चा एकमेव विद्यार्थी. या course चा विषय होता ‘how to die’. पण नकळत त्यातून त्यांनी आयुष्यं कसं जगावं - how to live’ हेच इतकं सुंदर शिकवलंय कि वाचणारा प्रत्येक माणूस- विद्यार्थी आयुष्याच्या प्रेमात पडावा. जगण्याच्या प्रेमात पडावा. पुस्तकाच्या शेवटी लेखक एक प्रश्न करतो, ‘Have you ever had a teacher like this?’ त्यावेळी मला एकच व्यक्ती डोळ्यासमोर आली. इतकच नव्हे तर पुस्तकं वाचताना प्रत्येक पानावर, प्रत्येक ओळीवर मला तीच व्यक्ती आठवतं होती ती म्हणजे- “आर्य रवींद्र”. आमच्या सहावीच्या वर्गाला ते प्रथम वर्गशिक्षक म्हणून आले आणि दहावी पर्यंत कायम राहिले. त्यांच्या बद्दल प्रेम, आपुलकी या भावना कधीच जाणवल्या नाहीत, होती ती कायम दहशत आणि दरारा. आता फक्त त्या ऐवजी मनःपूर्वक आदर आहे. शाळेत ते ‘मराठी’ आणि ‘समाज शास्त्र’ शिकवायचे. दोन्हीही विषय माझे अगदी कट्टर शत्रू. त्यामुळे त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती, त्यांच बोलणं आपसूकच कधी फार खोलवर मनात शिरलं नाही. किंवा मी शिरू दिलं नाही. त्या विषयांची दारं फारशी उघडली नाहीत. त्यात त्यांची जालीम शिस्त आणि वैविध्यपूर्ण शिक्षा. त्यामुळे emotionally, हळवेपणाने कधी त्यांचा विचार क्वचितच केला असावा. जो थोडाफार केला तो इतर वेळी म्हणजे सहली, क्षेत्रभेटी, शिबिरं, कार्यक्रम या काळात जे काही त्यांनी शिकवलं तेव्हा. त्यांचं प्रत्येक गोष्टीचं planning perfect असे. एखादी गोष्ट त्यांना सोपी करून सहज सांगता येत होती. त्यांच्याकडे एखादा विषय बोलायला खूप तऱ्हे तऱ्हे चे संदर्भ असत. वक्तुत्व सुरेख होतं, मुद्देसूद आणि खिळवून ठेवणारं. त्यांचं वाचन अफाट होतं. आणि वाचलेल्या छोट्या छोट्या गोष्टी ते त्यांच्या संदर्भासहित संपूर्ण लक्षात ठेवत. हस्ताक्षर, शुद्धलेखन अप्रतिम होतं. आमच्या कितीतरी प्रकल्पात, वह्यांत ते शिर्षक, अनुक्रमणिका लिहून देत. आम्ही नववी कि दहावी ला असताना आम्हाला ‘समाजसेवा’ नावाचा विषय होता आणि त्याला ३० कि ४० गुण होते. त्या करता आर्यांनी आम्हाला एक १०० पानी वही बनवायला सांगितली होती ज्यात काही निवडक समाजसेवकांविषयी माहिती गोळा करून लिहा, वहीला व्यवस्थित कव्हर घालून, सुवाच्य अक्षरात लिहा अशी सूचना केली होती. त्या वही साठी २० मार्क व उर्वरित छोटीशी लेखी परीक्षा असं काहीसं स्वरूप होतं. मला सुरवातीला वैताग आला होता कि ३० -४० मार्कांकरिता काय हे नसते उपद्व्याप. नाही तरी माहिती बघूनच लिहिणार त्यात काय मोठी वेगळी आखीव रेखीव वही. ४० मार्कांची परीक्षाच घेतली तर कुठे बिघडलं. पण रवींद्र आर्य! त्यांचा शब्द शेवटचा! म्हणून ऐन परीक्षेच्या आधी १५ दिवस ती सगळी माहिती गोळा करून, व्यवस्थित लिहून काढली. त्या साठी मला आमच्या घरी एक सुंदर पुस्तक मिळालं - ‘खरेखुरे आयडॉल्स’, समकालीन प्रकाशन. त्या पुस्तकात थोडक्यात, वैविध्यपूर्ण आणि विशेष म्हणजे नवीन लोकांविषयी माहिती मिळाली. इतिहासात वाचलेल्या फार जुन्या समाजसुधारकांहून वेगळ्या माणसांची. त्यामुळे माझी ती वही फार छान आणि वेगळी झाली. मला ती करताना खूप मजा आली, इतकी कि ती संपूर्ण आठवण माझ्या अजून लक्षात आहे. त्यावेळी ते सगळं करण्यातून मी एक नवीन पुस्तक आवडीने वाचलं, जे माझ्या कायमचं लक्षात राहिलं. ते वाचून मला नक्कीच एक वेगळी प्रेरणा मिळाली. या सगळ्या गोष्टी आर्यांनी तेव्हा आमच्या मनात, आयुष्यात अशा प्रकारे रुजवल्या हे आता कळलं. त्यांचा दृष्टिकोन तेव्हा कधीच कळला नाही पण आता लक्षात आला कि मन भरून येतं. असो! पण माझी हि वहीची आठवण अजून थोडी मोठी आहे. इतकं सगळं होऊनही मी नेमकी ती वही ज्या दिवशी submit करायची त्या दिवशी घरी विसरले. सगळ्यांनी वह्या दिल्या, मीच नाही. आर्यांना खूप सांगण्याचा प्रयत्न केला, कि मी खरच खूप सुंदर बनवलीय वही, उद्या नक्की देते, एक दिवस मला वाढवून द्या. पण नाही. दुसऱ्या दिवशी मी वही नेऊन ठेवली, मार्कही मिळाले मला, पण स्वतःच्या हाताने ती आर्यांकडे देणं, त्यांनी ती वही पाहणं, आणि त्यांचं कौतुक ऐकणं यातलं काहीच झालं नाही, अशी चूक मी कशी केली याचं मला फार फार वाईट वाटलं. अशीच एकदा त्यांनी आम्हाला आमच्या शाळेतील गाण्यांची व प्रार्थनांची एक वही लिहायला सांगितली, ऐन दहावी च्या वर्षात. तेव्हाही तो नसता ताप वाटला होता. उगाच वेळ फुकट जाणार म्हणून. पण ती वही आजही माझ्याकडे आहे. संपूर्ण नाही पण बरीचशी गाणी त्यात आहेत. ती वाचून आता शाळेचे दिवस आठवतात, त्या गाण्यांच्या चाली आठवतात. तो एक आता अमूल्य ठेवा वाटतो. हेही आर्यांमुळेच! अतिशय अबोल, शांत, सखोल आणि विनयशील व्यक्तिमत्व. म्हणाल तर हट्टी आणि शिस्तीचा जाच करणारे आणि म्हणाल तर जिद्दी आणि दूरदृष्टी असणारे! माझ्या आयुष्यातले माझे एकमेव गुरू! माझ्या आयुष्यात शिक्षक अनेक होते, आहेत व कायम असतील पण गुरू म्हणावे असे हे एकच जाणवले. शिक्षकांकडून शिकणं हे त्यांची बुद्धीे, हुशारीे, निपुणता यातून ज्ञान आत्मसात करणं. पण गुरूंकडून शिकणं म्हणजे या सगळ्या गोष्टींसोबतच त्यांच्या सहवास आणि वागणूकितून जगणं शिकणं. हे एक अजब नातं आहे जे आयुष्यभर पुरेल इतकी शिदोरी देतं. ह्या अनेक छोट्या छोट्या आठवणी मनात कायमचं घर बनवतात. प्रत्येक वेळी आठवताना एक नवा पैलू उघड करतात, आणि त्यातूनच आयुष्य घडतं. एखाद्याच आयुष्य घडवणं हि इतकी लाखमोलाची गोष्ट आहे, आणि हे गुरू अशी अनेक आयुष्य किती सहज आणि अभावितपणे घडवतात याचं मला कायम नवल वाटतं. शतशः प्रणाम ।। 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 प्रिय अश्विनी, खरंतर हे "प्रिय" तुझ्याबरोबर तुझ्यातील वैचारिक प्रगल्भतेला आहे. तुझं ई-पत्र वाचलं...आपल्या शालेय जिवनातील अनेक जाणिवा आणि नेणिवांबद्दल लिहीलस.फार आनंद झाला.कळत नकळत विद्यार्थी म्हणुन मुलांच्या काय अपेक्षा असतात हे समजलं..हा शोध कसा घ्यायचा हेच माहित नव्हतं.शिक्षक विद्यार्थ्यांच्या कमतरतेवर नेहमीच बोट ठेवत असतो.मी तुझ्या पत्रातुन माझ्यातील कमतरता शोधत होतो.कारण स्तुतीपेक्षा परखड विचार विकसनाच्या पाय-या असतात. तुमच्या बरोबर शिकलो ती पाच वर्ष ही तुमच्यासह माझ्या शिक्षकीपणाच्या पायाभरणीची होती.शांत,हुशार,नम्र,प्रामाणिक विद्यार्थी शिक्षकांना आळशी बनवतात.तुमचा संपूर्ण वर्ग विशेषत: तु तर माझा फार अंत पाहिलास.मला कैकदा नामोहरम केलस,हतबल केलस.परंतु तुझ्या आई बाबाचा पूरक व भक्कम पाठींबा हे आमचं बळ होतं.आणि आजचं " पत्र " हे त्या प्रयत्नाचं सुंदर फळ आहे. तु पत्रात माझ्याबद्दल जे लिहिलस त्याचं खरं श्रेय माझे अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.सुरेशजी नलावडे सर यांना द्यायला हवं.त्यानी मला इतकं दिलय की, ते मांडायला हे माध्यम फार मर्यादित आहे.."विचारांची स्पष्टता आणि वर्तनातील प्रामाणिकपणा हा शिक्षकाचा धर्म" हे त्याचंच वाक्य...आता कळतय हे अंगिकारणं किती कर्मकठीण आहे..जिद्द, हट्ट, शिस्तीचा अतिवापर हे त्यातून येतं. आणि म्हणुनच आज आम्ही सर्व तुमच्या एकमेव वर्गाचं आदर्श वर्ग म्हणुन ऊदाहरण देतो. "Tuesday with morrie" हे मला पुण्याला ABC त जुन्या पुस्तक दुकानात फुटपाथवर xerox स्वरूपात मिळालं. चाळलं तेंव्हा शिक्षकाविषयी काही आहे म्हणुन घेतलं, वाचलं,पुन्हा पुन्हा वाचलं तेव्हा गुरू शिष्याचं नातं किती हळुवार, किती परखड, किती व्यापक असतं हे समजलं.शाश्वत आणि अशाश्वताचा फरक, मानसशास्रीय संकल्पनांचे अक्षर विचार यात सापडले.आणि हीच माझी विषयापेक्षा विद्यार्थ्यांचा, मुलांचा शिक्षक होण्याची सुरवात.मदतीला तुम्ही आणि गुरूकुलाचं वातावरण... परिणाम काय तर आज मी तुझा शिक्षक असल्याचा अभिमान.. तुझ्याबाबतीत मात्र काही अंशी मी कमी पडलो ही खंत न विसरता येणारी. माझ्या काैटुंबिक समस्येची झळ तुझा दोष नसताना तुला सहन करावी लागली.तुला झालेल्या यातना,वेदना मी समजु शकतो. त्याबद्दल मी तुझा व तुझ्या आई बाबाचा क्षमाप्रार्थी आहे. कृपया एक दुःस्वप्न समजुन विसरून जा ही विनंती. त्यादिवशी भेट झाली पण फारच त्रोटक. तुझे अश्रु आणखीनच यातना देऊन गेले. त्याचा अर्थच लागेना.तुझा नंबर होता पण विचार ठाम नव्हता.आजपर्यंत ताण वाढत होता.. आज तुझं पत्र वाचलं आणि विचार शब्दात अवतरले. इतक्या वर्षानंतरही तुझ्याकडुन एक नवीन गोष्ट शिकता आली.. मन:पूर्वक धन्यवाद..! 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝💐💐💐💐💐💐💐💐