आज 'स्पीक यॉर लैंगुएज' दिवसाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा टम्बलर वर मराठीत पोस्ट लिहिणार आहे. थोडेफार विचित्र तर वाटतंय, पण तशीच उत्सुकता पण वाटतेय. मला माहित नाही की कोणी माझा हा प्रयोग वाचेल तरी का. तरी. माणसाने प्रयत्न करत जावे, फळ मिळो न मिळो.
पहिले तर मी शाळेत (किंवा इतर कुठेही) जास्त कधी मराठीत लिहीले नाही. त्यामुळे माझे लेखन येवढं चांगलं नाही. त्यावर हे किचकट मराठी कीबोर्ड! खरंतर, वाक्य आकलनीय आहेत तेवढेच पुष्कळ. व्याकरण तरी ठीक वाटतंय, शब्दलेखनात बर्याच चुका असतील. पण हा '[ते] दिसतं' की '[ते] दिसते' लिहायचं (की लिहायचे? हाश!) हा प्रकार काही मला समजला नाही. मी मला योग्य वाटतय तसं लिहित आहे पण ते बरोबर की नाही ते ठाऊक नाही.
दुसरं म्हणजे मी स्वतःसाठी लिंग काय वापरायचा हा एक प्रश्णच आहे. सध्या तर मी प्रयत्न करत आहे की वाक्यच असे रचायचे की याच्यावर विचार करायची वेळच येणार नाही. जसं 'करतो आहे' किंवा 'करते आहे' ऐवजी 'करत आहे' लिहायचं. मराठीत तिसरा लिंग तर आहे, पण त्या लिंगाला स्वायत्तता - ज्याला इंग्रजीत आपण 'एजन्सी' असे म्हणतो - मात्र नाही. तर मग आपल्यालाच आपले नविन व्याकरण बनवावे लागणार.
आत्ता साठी तरी येवढंच. आजुन काही विचार आहेत पण ते मी पुढच्या टिप्पणीत कळवेल.
















