मन, भावना, बुद्धी व शरीर यांचा समन्वय चांगला असेल तरच आपण व्यक्तिगत, व्यावसायिक व सामाजिक आयुष्यात यशस्वी होऊ शकतो, हे सत्य आहे. हे सिद्ध झालेले आहे की, बौद्धिक क्षमता व भावनिक क्षमता याची तुलना केली, तर भावनिक क्षमता चांगली असणारी व्यक्ती सर्वांगीण आयुष्य छान जगू शकते. म्हणजे व्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्यात दोन्हीकडे यशस्वी होऊ शकते. कुठल्याही मानसिकतेच्या समूहाचे नेतृत्व करू शकते. आपले ‘आतले’ जग शांत राहिले, तरच ‘बाहेरच्या’ जगासाठी आवश्यक असलेली स्वस्थता, कार्यक्षमता, निर्णय घेण्याची क्षमता, धैर्य, तणाव सहन करण्याची क्षमता व यासाठी आवश्यक असलेला भावनिक समतोल साधणे शक्य होते.
अदितीच्या जन्मानंतर पहिले दीड वर्ष अदिती, थोडावेळ क्लिनिक व घर यामध्येच मी बिझी होते. अदिती साधारणपणे दीड वर्षांची असताना सोमनाथनगर जवळील बंगला सोडून आम्ही येरवडा भागातील नागपूर चाळीमागे असलेल्या त्रिदलनगर येथे राहायला आलो. सोमनाथनगर जवळील बंगल्यापासून चंदननगरमधील माझे क्लिनिक फार जवळ होते. पण अदिती व नुपूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही जागा योग्य नव्हती. म्हणून आम्ही त्रिदलनगरमध्ये राहायचा निर्णय घेतला.
त्रिदलनगरमध्ये राहायला आल्यावर मात्र मी सकाळचे फिरणे सुरु केले. मोकळ्या हवेत सकाळी फिरून आल्यावर दिवसभर प्रसन्न वाटायचे. दिवसभर भरपूर काम करायला उत्साह असायचा. अदिती साधारणपणे दीड वर्षाची असताना तिच्या मतिमंदत्वावर शिक्कामोर्तब झाले. मी डॉक्टर आई असल्यामुळे तिच्या प्रगतीचे टप्पे बरेच उशिरा येतात, हे माझ्या लक्षात येत होते. मला असे वाटते माझा फारशी कुरकूर वा तक्रार करायचा स्वभाव मुळातच नाही व आहे ते स्वीकारून पुढे जायचे या स्वभावामुळेच अदिती मतिमंद आहे हे नक्की झाल्यावर, मला आभाळ कोसळले असे वाटले नाही. अदिती, रांगलीच नाही. दीड वर्षांची असताना बसायलाच लागली. दीड वर्षांची असताना तिला उभे पण राहाता येत नव्हते. लहान मुलांचे डॉक्टर व वैद्य नानलसुद्धा म्हणायचे थोडीशी मागे आहे; पण थोडे वर्षात ती चांगली प्रगती दाखवेल. पण माझ्या मनाला हे फारसे पटत नव्हते, कारण प्रत्यक्षात तिची प्रगती फार मंद गतीने होत होती. पण तरीसुद्धा हे माझ्याच बाबतीत का, असे विचार मनात आले नाहीत. आता काय करायला पाहिजे म्हणजे अदितीमध्ये सुधारणा होईल, हा विचार सुरु झाला. यानंतर १४ वर्षांपर्यंत अदितीच्या प्रगतीला पोषक वातावरण व योग्य त्या थेरपीज सुरू होत्या. याचा सविस्तर उल्लेख पूर्वीच आला आहे.
१९९२मध्ये आम्ही बोटक्लबची मेंबरशीप घेतली व तेथेच मी जिमला जाऊ लागले. तोपर्यंत अदिती, बॅबीनो या आमच्या घराजवळील नर्सरीमध्ये जाऊ लागली होती. अदिती व नुपूर शाळेमध्ये गेल्या की, मी जिमला जात असे व जिम झाल्यावर परस्पर क्लिनिकला जात असे. सकाळी जरा घाईच व्हायची. कारण नुपूरचे आवरायचे असायचे. नुपूरपण तशी लहानच होती. अदितीची औषधे, मसाज, आंघोळ झाली की दोघींचे डबे तयार करायचे. यामध्ये स्वयंपाकाची बाई येणार नसेल तर दुपारचा स्वयंपाक करून ठेवायचा, अशावेळी मात्र खरंच खूप घाई व्हायची. पण मी सहसा जिमला जाणे सोडत नसे. दुसऱ्या दिवशी महत्त्वाचे काही कार्यक्रम वा जास्तीचे काही काम असेल, तर त्या दृष्टीने नियोजन आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवत असे. मला वाटते, मला ही सवय तेव्हापासूनच लागली व त्या सवयीचा फायदा मला आजही होत आहे.
अदिती शाळेतून येईपर्यंत मी क्लिनिकमधून घरी आलेली असे. मग आमचे जेवण व अदितीच्या सर्व थेरपीज चालू व्हायच्या. कधी ती प्रतिसाद द्यायची तर कधी अजिबात प्रतिसाद द्यायची नाही. पण या प्रयत्नांचा फायदा दिसून येत होता. साडेतीन वर्षांची असताना अदिती चालू लागली. हाताने खायचा प्रयत्न करू लागली. हे माझ्या दृष्टीने आशादायी चित्र होते. या काळात कधीतरी निराश वाटायचे, पण फार थोडा वेळ. कारण अदितीकरता करण्यासारखे इतके होते की, ते करायला मला दिवस पुरत नव्हता. अदिती बरोबरच या काळात नुपूरच्या अभ्यासाकडे म्हणजे होमवर्ककडे मला लक्ष दयावे लागायचे, कारण तोही रोजच्या रोज पूर्ण करणे गरजेचे होते. अदिती व नुपूरचे आवरून मी क्लिनिकला जात असे. मी निघेपर्यंत बाई आलेल्या असत. अदितीला बाईंच्या ताब्यात देऊन मी क्लिनिकला जात असे. अर्थात सासू-सासरे घरी असायचेच, पण त्यांच्यावर जबाबदारी देण्याचे मी पहिल्यापासूनच टाळले. कारण प्रत्येकाला स्वतःचे आयुष्य असते व या वयात नुकतेच ते सर्व जबाबदारीतून मुक्त झालेले असतात. हा काळ त्यांचा मोकळेपणाने जगण्याचा असतो. अशावेळी त्यांना नातवंडांमध्ये पूर्ण वेळ अडकवणे बरोबर नाही, असे मला वाटत होते. संध्याकाळी बाई अदितीला घेऊन बागेत जात असत. तेथे इतर मुलांबरोबर खेळत व कधी कधी नुपूर व तिच्या मैत्रिणींचा खेळ बघत अदितीचा वेळ छान जायचा. रात्री मी घरी आल्यावर थोडावेळ टी.व्ही. बघून झाल्यावर परत मी अदितीचे ब्रेन जिम, ऑक्युपेशनल थेरपीचे व्यायाम, अॅक्युप्रेशर पॉइंट व मसाज देत असे. हे झाल्यावर रोज रात्री अदितीला मांडीवर घेऊन (कारण ती खाली शांत झोपायची नाही) नुपूरला गोष्ट सांगायची. गोष्ट ऐकता ऐकता नुपूर झोपून जायची. हे आमचे रुटीन नुपूर स्वतःहून वाचायला लागेपर्यंत चालू होते. यानंतर मी अदितीला गोष्ट सांगू लागले. सुरुवातीला तिच्याच दिनक्रमामधील वा तिला काही संकल्पना नीट समजाव्यात अशा गोष्टी मनोरंजक पद्धतीने सांगत असे. यामध्ये मला आठवतंय प्रतिबिंब संकल्पना तिला समजावी म्हणून माकडाची गोष्ट मी सांगत असे.
१९९२मध्येच हिमालयामध्ये ट्रेकिंगला जायची संधी चालून आली. नुपूरने व मी जावे असे ठरले. माझे हे पहिले हिमालयातील ट्रेकिंग. माझी जिममुळे व नुपूरची तायकोंदू व थोड्या प्रमाणात खेळत असलेल्या टेनिसमुळे शारीरिक तंदुरुस्ती चांगली होती. पण आम्हाला ट्रेकिंगची सवय नव्हती. नुपूर जेमतेम आठ वर्षांची होती. आम्ही दर रविवारी सिंहगडावर प्रॅक्टिस ट्रेकसाठी जाऊ लागलो. आम्ही म्हणजे मी, नुपूर, शेखर व अदिती. भल्या पहाटे साडेपाच वाजता आम्ही कारने सिंहगडला जात होतो. सगळ्यांनाच ट्रेक करायला मजा येत होती. मी व नुपूर अगदी सहज सिंहगड चढायचो. त्यामुळे हिमालयातील ट्रेकिंगचा अनुभव घ्यायला आम्ही उत्सुक होतो. यानंतर मी व नुपूर मे महिन्यामध्ये येरवडा डॉक्टरांच्या ग्रुपबरोबर मनाली जवळील रोहतांग पास येथे ट्रेकला जाऊन आलो. ट्रेकिंग करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करुन ट्रेक पूर्ण केला की एक वेगळेच समाधान मिळते, हे अनुभवले. मी व नुपूर डोंगर लीलया चढत उतरत होतो. हे करायची एक छान लय आम्हाला सापडली होती. स्वतःच्या क्षमतांवरचा विश्वास वाढतोय असे लक्षात आले. हवेमधील अनिश्चितता, निसर्गामधील शांतता, भव्यता, सात्विकता तशीच रुद्रता मला फार भावली. निसर्गामध्ये आपल्या क्षुद्रतेची जाणीव झाली. आपण किती कमीत कमी साधनसाम्रगीमध्ये राहू शकतो, हेही लक्षात आले. काहीतरी हरवलेले सापडले आहे, असे वाटले. मला वाटते माझ्या आयुष्यातील थोडी स्वस्थता, शांतता हरवली आहे, याची प्रचिती मला हिमालयात आल्यावर आली. कारण रोजच्या व्यस्त दिनक्रमात ते हरवलेपण समजून घ्यायलाही उसंत नव्हती. हिमालयात आल्यावर माझे माझ्याशीच नाते घट्ट झाले. मला असे जाणवले की, आपले आपल्याशी नाते चांगले असेल तरच आपण इतरांशी चांगले नाते प्रस्थापित करू शकतो.
स्वतःचे व्यक्तिमत्त्व जपले पाहिजे याचा साक्षात्कारही मला ट्रेकला जाऊनच झाला. साक्षात्कार अशाकरता की, हे प्रत्यक्षात करताना कधीतरी स्वतःला वेळ देताना कुठेतरी अपराधीपणाची भावना असायची. इथे आल्यावर त्या विचारांमध्ये सुस्पष्टता आली की, आपण जर मुले, नवरा, घर, क्लिनिक यासाठी वर्षांनुवर्षे विनातक्रार प्रेमाने व आत्मीयतेने करतोय, तर वर्षातून दहा-बारा दिवस स्वतःसाठी काढायला काहीच हरकत नाही. याही पुढे जाऊन असे लक्षात आले की, घरच्या सगळ्यांचेच मानसिक व शारीरिक स्वास्थ्य निरोगी राहाण्यासाठी हा बदल प्रत्येकासाठी गरजेचा आहे. मला अजून एक गोष्ट जाणवली की, ट्रेकला असताना मला घर, अदिती, शेखर, क्लिनिक याची फारशी आठवण येत नव्हती. मी वर्तमानात जगायला व प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिकत होते.
एकंदर हिमालयामधील ट्रेकिंग हा माझ्या आयुष्यातील फार आनंदी ठेवा आहे. हा आनंद मला शेखरमुळे मिळाला. मी घरी नसताना शेखर, घरकाम करणारी बाई व माझे सासू-सासरे हे सगळे मिळून अदिती व घरची जबाबदारी सांभाळायचे.
हिमालयातील ट्रेकमुळेच माझे निसर्गाशी नाते परत प्रस्थापित झाले. मला आठवतंय लहान असताना मी मैत्रिणींबरोबर रोज नदीवर फिरायला जात असे. आम्ही तेथे मस्त नदीच्या वहात्या पाण्यात पाय टाकून गप्पा मारत बसायचो. अनेक मासे व पाणनाग आम्हाला दर्शन देऊन जायचे. सुट्टीच्या दिवशी मैत्रिणीच्या बागेत बसून अभ्यास करायचो. पावसाळ्यामध्ये आम्ही नदीकिनारी फुलपाखरांच्या मागे धावायचो व तेव्हाच गच्च झाडीत घुसून वेगवेगळ्या रंगांची गुलबक्षीची फुले काढून त्यांचे गजरे आईकडून बनवून घ्यायचो. निसर्गाशी असलेले हे जुने नाते पुनःप्रस्थापित झाल्यामुळे, मला खूप काही हरवलेले गवसले होते. हा दहा-बारा दिवसांचा बदल मला वर्षभर छान आयुष्य जगायची प्रेरणा द्यायचा.
१९९८मध्ये मला विपश्यना या ध्यानप्रक्रियेबद्दल समजले व मला हे समजून घेण्यात व करून बघण्यात उत्सुकता वाटू लागली. विपश्यना या शब्दाचा अर्थ जी गोष्ट जशी आहे तशी जाणणे. या शिबिरामध्ये भाग घेण्यासाठी ११ दिवस काढावे लागतात. १० दिवस ध्यान केंद्रात राहून आर्यमौन पाळून ही साधना करायची असते. मी शेखरशी चर्चा करून नाशिक जवळील इगतपुरी इथे शिबिरासाठी जायचे ठरवले. मी बसने रात्री नाशिकला पोहोचले व तेथून दुसरी एस.टी. घेऊन इगतपुरीला गेले. या ध्यान केंद्रात प्रवेश केल्यावरच एक वेगळ्याच शांततेचा अनुभव आला. इथून पुढे १० दिवस रात्रीचे जेवण बंद असणार होते. किंबहूना पाच वाजता लिंबू सरबत व चुरमुरे खाल्ल्यानंतर काहीच खायचे नाही, असा नियम होता. धम्मा हॉलमध्ये आम्हाला पुढे दहा दिवस विपश्यना करायची होती.
बुद्धाला भारतामध्ये ध्यानातूनच निर्वाणाला वा अंतिम सत्यापर्यंत पोहोचता आले होते. बुद्धाने व त्यांच्या अनुयायांनी या विद्येचा प्रसार भारत व भारताबाहेर काही देशांमध्ये केला होता. काही कारणाने भारतातून ही विद्या लुप्त झाली. पण ब्रम्हदेशात काही साधकांनी ही विद्या शुद्ध स्वरुपात जपून ठेवली होती. मूळचे भारतीय, परंतु ब्रम्हदेशामध्येच जन्म व पालनपोषण झालेल्या सत्यनारायण गोयंकाजींनी ही पुरातन विद्या शिकून परत १९६९ साली भारतामध्ये आणली. काही प्राथमिक सूचना देऊन झाल्यावर आम्हाला गोयंकाजींचा व्हिडिओ दाखवण्यात आला. हा व्हिडिओ बघून आम्हाला पुढे दहा दिवसांत काय करायचे आहे, याचे मार्गदर्शन मिळाले. श्वासावर मन केंद्रित करायचे हे आनापान सती ध्यानातून तीन दिवसांत शिकायला मिळाले. यानंतरची पुढची पायरी विपश्यना ध्यान. यामध्ये शरीरामधील संवेदना, मन समतेमध्ये ठेवून बघायच्या. म्हणजे डोळे बंद ठेवून मनाने शरीरावरील संवेदना जाणून घ्यायच्या. आपल्या लक्षात यायला लागले की, मनाचे व शरीराचे अतूट नाते आहे. या दहा दिवसांत रोज १२ तास ध्यान करायचे असते. दिवस पहाटे चार वाजता सुरु होऊन रात्री नऊ वाजता संपतो. रोज संध्याकाळी गोयंकाजींचे मार्गदर्शनपर प्रवचन असते. या प्रवचनातून आपल्या अनेक शंकांचे निरसन होते. नऊ दिवस आर्यमौन पाळायचे असते. आर्यमौन म्हणजे बोलायचे तर नाहीच पण खाणाखुणांनी, नजरेने वा हावभावाने पण एकमेकांशी संवाद साधायचा नाही. पेपर व पुस्तक वाचन, टी.व्ही. बघणे, फोनवर बोलणे अर्थातच नाही. काही मदत लागलीच तर सेवक व सेविकांशी आपण बोलू शकतो. ध्यान करताना आपले मन किती चंचल आहे, हे लक्षात येते. अगदी एक-दोन श्वाससुद्धा आपण मन श्वासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. दहा दिवसांमध्ये हळूहळू आपले मन ताब्यात यायला लागते. श्वास व संवेदना बघायला शिकते. ही विपश्यनेची पहिली पायरी आहे. चांगल्या व वाईट संवेदनांचे निरीक्षण करताना आपण दोन्ही संवेदना मनाची समता ठेवून बघायला शिकायचे असते. संवेदनासारख्या बदलत असतात. यातून आपणाला आयुष्यातील अनित्यतेची जाणीव होते. आपण आयुष्याकडे वेगळ्या नजरेने बघायला शिकतो. कुठल्याही गोष्टीची वा नातेसंबंधाची आसक्ती वा तिरस्कार केला तर आपल्याला दुःखच मिळते, हे आपल्याला शारीरिक, मानसिक व भावनिक स्तरावर पटायला लागते. विपश्यनेच्या नियमित अभ्यासाने आपले मन शुद्ध व्हायला लागते. आपला षडरिपूंवर नियंत्रण ठेवायसाठीचा प्रवास सुरू होतो.
मी त्यानंतर विपश्यनेचे सहा कोर्सेस केले व नियमित घरी विपश्यना करते. या साधनेमुळे आपण घडलेल्या चांगल्या वाईट घटनांकडे, स्वतःकडे व इतरांकडे तटस्थतेने बघायला शिकतो. वागण्यात कुठे चूक झाली तर स्वतःशी तरी आपण ती कबूल करतो व ही समज आली की परत ती चूक होत नाही. तसेच स्वतःच्या चांगल्या गुणांबद्दल अभिमान बाळगायला शिकतो. यातून आत्मविश्वास, आत्मसन्मान वाढत जातो. अनेक आव्हानांचा आपण सहज यशस्वी सामना करू शकतो. तसेच वेळप्रसंगी अवघड वाटणारे निर्णय घ्यायचे धारिष्ट्य आपल्यात येते. मला स्वतःला विपश्यनेने खूप दिले. ध्यानाने आपल्याला आत्मभान यायला मदत होते. आत्मभान जागरुक असेल, तर मनाच्या बदलणाऱ्या भावनांकडे आपण जागरूकपणे बघायला शिकतो. आपण आपल्यासमोर असणाऱ्या पर्यायामधून योग्य निवड करू शकतो. जिथे निवडीला वावच नाही, अशावेळी आपण आहे ती परिस्थिती स्वीकारू शकतो.
माझ्यामध्ये करुणा, प्रामाणिकपणा व धीर होताच, तो वाढीस लागला. दांभिकपणा, खोटेपणा, अप्रामाणिकपणा करणाऱ्या व्यक्ती संपर्कात आल्या तर माझ्या प्रतिक्रिया नकारार्थी असायच्या. त्यांच्यामधील नकारार्थी वृत्तीला मी प्रतिक्रिया द्यायची. त्यामुळे संघर्ष ठरलेला असायचा. अशी प्रतिक्रिया द्यायचे पूर्णपणे नाही, तरी आता बऱ्याच प्रमाणात टाळता यायला लागले. सर्वांशी फक्त माणुसकीच्या नात्यानेच वागायचे, ही भावना वाढीस लागली. मदत करताना उपकाराची भावना न ठेवता करुणेने व मोकळ्या मनाने मदत करायची भावना वाढीस लागली. क्षमाशीलता वाढीस लागली. याचा फायदा व्यक्तिगत आयुष्यात व व्यावसायिक आयुष्यात झाला. पूर्वी कोणी काही मनाविरुद्ध बोलले वा उद्धटपणाने वागले, तर बराच वेळ वा बरेच दिवससुद्धा तो विचार मनात घोळत असे व त्या व्यक्तीबद्दल मनात अढी बसत असे. या भावनेमध्ये पण बराच बदल झाला. कारण त्या व्यक्तीबद्दल पण करुण भावना मनात येऊ लागली. त्या व्यक्तीला स्वतःला काहीतरी त्रास असेल म्हणून ती व्यक्ती असे वागली असेल वा ते त्या व्यक्तीचे वैयक्तिक मत होते. ते आपल्याला पटले नाही तरी. असा विचार मनात येऊन त्या व्यक्तीबद्दलचा राग लवकर कमी होऊ लागला. पद, सत्ता, जात, पैसे, शिक्षण, लिंग, देश यापलीकडे जाऊन जजमेंटल न होता फक्त माणूस म्हणून संवाद साधता येऊ लागला. विचारांमध्ये आहे ती सुस्पष्टता वाढू लागली व मुख्य म्हणजे अंतिम शुद्ध विचारापर्यंत पोहोचण्यापासून आपण किती लांब आहोत, याचीही प्रचिती आली. रोज विपश्यना केल्याशिवाय हा प्रवास पुढच्या स्तरावर जाणार नाही, याचीही जाणीव झाली. विपश्यना ध्यान संपताना शेवटची पाच मिनिटे मैत्रीभाव द्यायचा असतो. यामध्ये आपले सहकारी, आप्त, मित्रमैत्रिणी, किंबहुना जगातील सर्व प्राणिमात्र सर्वांचे मंगल होऊ दे अशी भावना व्यक्त करायची असते. याही पुढे जाऊन आपला कोणाशी काही कारणाने वाद झाला असेल, तर त्याही व्यक्तीचे मंगल वा भले होऊ दे, अशी भावना व्यक्त करायची. मला स्वतः विपश्यनेमधील हा भाग फार आवडतो. कारण सर्वांबद्दल चांगली भावना ठेवली तरच आपण सुखी होतो, आनंदी होतो, याचा अनुभव आपण मैत्री भावनेतून घेऊ शकतो.
१९९८ साली माझ्या धाडसाला आव्हान देणारी अजून एक संधी चालून आली. पुण्यामधील डॉ. शिरीष पटवर्धन व डॉ. दिलीप सारडा यांनी पुणे सायकल प्रतिष्ठानची स्थापना केली. यांची पहिली सायकल रॅली पुणे- हैदराबाद अशी जाणार होती. याकरता ते सर्वजण दर रविवारी साधारणपणे ८० ते १०० किलोमीटर सायकलिंग करत होते. शेखरला त्यांनी पुणे-रांजणगाव-पुणे या सायकल रॅलीसाठी बोलावले होते. नुकतेच शेखर व नुपूर युरोपचा यशस्वी सायकल दौरा करून आलेले होते. ते युरोपला जाण्याआधी, त्यांच्याबरोबर मी काही वेळा सायकलिंगला गेले होते. शेखरने मला ‘यायचे का’ असे विचारले. मला अर्थातच असे उद्योग करायला आवडतातच. त्यामुळे मी लगेचच होकार भरला. एका रविवारी पहाटे आम्ही निघालो. या ग्रुपमध्ये मी एकटीच स्त्री होते. मी सायकलिंगचा आनंद घेत विनासायास सायकलिंग करत होते. आम्ही व्यवस्थित रांजणगावला पोहोचलो. संध्याकाळी चारपर्यंत आम्ही पुण्यात पोहोचलो. सर्वांना आश्चर्य वाटत होते, कारण पहिल्याच लांब टप्प्याचे अंतर मी व्यवस्थित पूर्ण केले होते. निघताना मला त्यांनी विचारले पुणे-हैदराबाद सायकल रॅलीमध्ये सहभागी होणार का? विचार करून सांगते असे म्हणून मी व शेखर घरी आलो. नंतर शेखरने व मी चर्चा केली. शेखरला या रॅलीमध्ये सहभागी व्हावेसे वाटत नव्हते, ‘तुला जायचे असेल तर तू जा’ असे शेखर म्हणाला. मी जायचे ठरवले. मग दर रविवारी सरावासाठीचे सायकलिंग सुरु झाले. इतक्या लांब पल्ल्याचे सायकलिंग, भारतातील डॉक्टरांचा ग्रुप पहिल्यांदा करणार होता. या सरावादरम्यान आम्ही पुणे-नारायणगाव, बारामती, लोणावळा, सासवड, मुळशी अशा अनेक ठिकाणी गेलो.
पुणे-हैदराबाद रॅलीचा दिवस जवळ येत होता. रॅली निघायचा दिवस व सहभागी नक्की झाले. मी एकटी स्त्री सहभागी असणार होते.
पुणे-हैदराबाद रॅलीचा शुभारंभ शनिवारवाडा येथून होणार होता. आम्ही सर्व सहभागी सायकल घेऊन सकाळी लवकर शनिवारवाड्यावर पोहोचलो. रुबी हॉल या हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. ग्रॅट यांच्या हस्ते आमचा सत्कार होऊन रॅलीस आरंभ झाला. शनिवारवाड्यासमोर सहभागींचे नातेवाईक, अनेक पत्रकार व प्रेक्षक मिळून भरपूर गर्दी झाली होती. या गर्दीतून वाट काढतच सायकल रॅलीचा आरंभ झाला. डॉ. ग्रॅट आमच्याबरोबर ठरावीक अंतरापर्यंत सायकल चालवत येणार होते. थोडयाच वेळात ते सायकल चालवत माझ्या बाजूला आले. त्यांनी मला उत्सुकतेने विचारले, ‘लेडी डु यू थिंक यू विल बी एबल टू कंप्लीट धीस सायकल रॅली?’ मी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलेले आठवतंय ‘येस सर!’ पुढचे पाच दिवस अविस्मरणीय होते. पहाटे लवकर आम्ही सायकलिंग सुरु करत असू. दर तासाने वीस मिनिटांची विश्रांती असे. आम्हाला मदत करण्यासाठी आमच्या बरोबर असणाऱ्या वहानांमध्ये चार ते पाच स्वयंसेवक असायचे. ते पुढे जाऊन आमच्या नाष्ट्याची, जेवणाची व राहायची सोय बघत होते. रस्त्यांमधील गावांतील डॉक्टर आम्हाला अनेक प्रकारे मदत करत होते. पाच रात्री पाच गावांमध्ये आमचा मुक्काम होता. प्रत्येक ठिकाणी आमचे जोरदार स्वागत झाले. टी.व्ही. चॅनेल, वृत्तपत्र प्रतिनिधींनी आमच्या मुलाखती घेतल्या. या ग्रुपमध्ये एकच स्त्री सहभागी म्हणून माझ्याबद्दल त्यांना विशेष उत्सुकता वाटत होती. मजल-दरमजल करत पाचव्या दिवशी संध्याकाळी आम्ही हैदराबादला पोहोचलो. यांनतरच्या काळात सायकल प्रतिष्ठानच्या, पुणे शहरातील रविवारच्या रॅलीमध्ये, नवक्षितिजच्या विशेष मुलांना घेऊन काही वेळा सहभाग घेतला. पण लांब पल्ल्याच्या सायकल रॅलीमध्ये मी सहभागी झाले नव्हते.
२००४मध्ये सायकल प्रतिष्ठान तर्फे एक महिन्याने पुणे ते मुंबई असे सायकल रॅलीचे आयोजन होत आहे, असे कळले. माझे सायकलिंग जवळजवळ थांबलेलेच होते. पण सायकल होती व क्वचित मूड आला तर मी १० ते १५ किलोमीटर सायकलिंग करत असे. मला या सायकल रॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे वाटू लागले. एकतर ही दोन दिवसांचीच होती. पहिल्या दिवशी पुणे ते पनवेल व दुसऱ्या दिवशी पनवेल ते मुंबई अशी सायकल रॅली होती. या रस्त्याने इतक्या वेळा कार व बसने गेले होते, याच रस्त्यावर २००३मध्ये २७ विशेष मुलांना घेऊन पुणे- लोणावळा पदयात्रेचे नियोजन केले होते. याच रस्त्यावर सायकल चालवायची कल्पनाच मला भन्नाट वाटली. मी शेखरशी चर्चा केली व पुरेसा सराव नसताना आम्ही दोघांनी या रॅलीमध्ये भाग घ्यायचे ठरवले. मनाचा निर्णय नक्की असल्यामुळे शरीर साथ देईल याची खात्री होती. नवक्षितिजमधील ज्या मुलांना सायकलिंग येत होते, त्यांना या रॅलीमध्ये सहभागी करून घ्यावे, जेवढे जमेल तिथपर्यंत मुले सायकलिंग करतील, पण सहभागाचा आनंद मुलांना नक्कीच मिळेल, अशी माझी या मागची भूमिका होती.
१७ जानेवारीला २००४मध्ये शनिवारी भल्या पहाटे आम्ही तीन विशेष मुलांना घेऊन पुणे विद्यापीठाच्या आवारात जमलो. येथून सायकल रॅलीची सुरुवात होणार होती. विशेष मुलांना रॅलीमध्ये सहभागी होताना बघून अनेकांच्या नजरा कौतुकाने त्यांच्याकडे बघत होत्या. या कौतुकाने मुले एकदम खुशीत होती. सुरेश कलमाडी रॅलीचे उद्घाटन करायला व आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. जय शिवाजी, जय भवानी व गणपती बाप्पा मोरया या घोषणांच्या गदारोळातच पुणे-मुंबई रॅली निघाली. मी मुलांबरोबरच होते. थोडे अंतर गेल्यावर एका मुलाला गर्दीत सायकल चालवणे अवघड जाऊ लागले. तो तेथूनच परत फिरला. अर्थात ही मुले पालक वा स्वयंसेवक यांच्याबरोबर परत गेली. तिसरा मुलगा दमून वडगाव मावळहून परत गेला. वडगाव मावळला सगळ्यांनी नाष्टा केला व सायकल रॅली पुढे निघाली. मी व शेखर इतर सहभागींबरोबर पुढे जाऊ लागलो.
वडगाव मावळनंतर पुढे लोणावळ्याचा चढ व वारा यामुळे सायकलिंग जरा जड जात होते. आमचा कमी झालेला सराव येथे सायकलिंग करताना जाणवत होता. एकदाचे आम्ही सर्वजण लोणावळ्याला पोहोचलो. कामत हॉटेलमध्ये थांबून चहा, कॉफी, सरबत घेतले. ज्यांना भूक लागली होती त्यांनी खाऊन घेतले व आम्ही परत सायकलिंग सुरु केले. आजचा मुक्काम पनवेल येथे होता. लोणावळ्यानंतर बऱ्यापैकी उतार होता. या उतारावर सायकलिंग जपूनच करावे लागत होते, कारण खूप वेगात गेलो व ऐनवेळी ब्रेक नाही लागला तर कठीण प्रसंग. मला मात्र या उतारावर सायकलिंग करायला मजा येत होती. जवळून कार, ट्रक वेगाने जात होते. अशा ठिकाणी सायकलिंग करायचा थरार वेगळाच असतो. पनवेलजवळ येता येता संध्याकाळ झाली. मावळत्या उन्हाच्या किरणांमध्ये व सपाट रस्त्यावर सायकलिंग करायची मजा काही औरच. मला तो सुखद अनुभव जसाच्या तसा आतासुद्धा आठवतोय.
आमची सर्वांची सोय एका डॉक्टरांच्या पनवेल जवळील फार्म हाऊसवर केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो. पनवेलनंतर लगेचच मुंबईची गरम हवा व वातावरण जाणवू लागले. मोठ्या मोठ्या उंच इमारती दिसू लागल्या व लांबच लांब फ्लाय ओव्हर यावरून सायकलिंग करताना थोडी दमछाक होत होती, कारण वारे वेगाने येत होते. जवळून वेगाने जाणाऱ्या वाहनांचा त्रास तर होतच होता, पण आम्ही सगळेजण खूप खुशीत सायकल चालवत होतो कारण आम्ही मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवत होतो. नव्या मुंबईनंतर ट्रॅफिक खूपच वाढले. आमच्या बरोबरची पायलट कार आम्हाला रस्ते दाखवायचे काम करत होती. नव्या मुंबईनंतर आम्ही सर्वजण एकत्र जथ्यातच सायकलिंग करू लागलो. आम्ही मजल-दरमजल करत दुपारपर्यंत वांद्र्याला असलेल्या एम.आय.जी. स्टेडियमवर पोहोचलो. सगळेच जाम खुश होते व विशेषतः मी जास्त खुश होते कारण फार वर्षांनी लांब पल्ल्याचे सायकलिंग यशस्वीपणे पूर्ण करू शकले.
एनड्युरो थ्री धाडसी स्पर्धा –
१२ जानेवारी २००४साली क्लिनिकमध्ये मी पेशंट बघत असताना फोन वाजला. पलीकडून आवाज आला, ‘मी केळकर बोलतोय. केतन केळकर. व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला आपण बरोबर होतो’ आता लिंक लागली. औरंगाबादचे केळकर. काय म्हणताय वगैरे झाले. केळकर म्हणाले, ‘अगं, माझा पुतण्या समीर मुंबईला आय.आय.टी. पवईला इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. तो पुण्याला ६,७,८ फेब्रुवारीला Enduro-3 या Adventure Race मध्ये भाग घेतोय. मी म्हटलं, ‘अरे वा!’ केळकर म्हणाले, ‘नुसते अरे वा! म्हणू नकोस. तू पण त्या मध्ये भाग घे. तू सायकलिंग व ट्रेकिंग केलेले आहेस, म्हणून तुझे नाव सुचविले आहे. समीर बरेच दिवस महिला खेळाडू शोधतोय, पण त्याला मिळत नाहीये.’
मग समीर फोनवर आला. समीर माझ्या मुलीच्याच वयाचा. त्याला म्हटलं, ’१७-१८ जानेवारीला होणाऱ्या पुणे-मुंबई सायकल रॅलीमध्ये मी आहे. आपण १८ जानेवारीला दुपारी एक वाजता एम.आय.जी. स्टेडियममध्ये वांद्र्याला भेटू. मग सविस्तर बोलू.’ १८ जानेवारीला आमचे जेवण होईपर्यंत वांद्र्याला समीर मला भेटायला आला. त्याने Enduro-3 या Adventure Race ची सविस्तर माहिती दिली. नॅशनल एज्युकेशन फाउंडेशनने (NEF) या स्पर्धेचे आयोजन भारतामध्ये दुसऱ्यांदाच केलेले आहे. २००३ साली म्हणजे मागच्या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा पुण्यामध्येच झाली होती.
या स्पर्धेसाठी दोन व्यावसायिक गट, एक हौशीगट व एक महाविद्यालयीन असे चार गट असणार होते. तिघांचा मिळून एक संघ. यापैकी एक व्यावसायिक, हौशी व महाविद्यालयीन गटात प्रत्येक संघात एकतरी महिला खेळाडू आवश्यक असा नियम होता. या स्पर्धेमध्ये १४० कि.मी. डोंगरातील सायकलिंग, ८० कि.मी. ट्रेकिंग, नदी पोहून ओलांडणे, रायफल शूटिंग, नौकायन, रात्री रस्ता शोधणे, (night navigation) हे सर्व करायचे होते फक्त अडीच दिवसांत. हौशी व महाविद्यालयीन गटाला सायकलिंग व ट्रेकिंग कमी होते. त्यांची स्पर्धा दीड दिवसाची होती.
हे सर्व ऐकून मी समीरला म्हटले, ‘हे सर्व जरा जास्तच होईल रे माझ्या ४४ वर्षांच्या वयाला. मी तुला विचार करून कळवते.’ लगेच होकार न कळवल्यामुळे समीर खूप नाराज झाला होता. त्याला जास्त आग्रहपण करता येईना. कारण त्याच्या आईच्याच वयाची मी. पुणे-मुंबई सायकल रॅलीवरून आल्यावर रविवारी विश्रांती झाली. या स्पर्धेविषयी शेखरशी परत बोलले व त्यालाही असे वाटले ही संधी घालवू नये. नंतर वाईट वाटेल. सोमवारी सकाळी मला पण वाटले, बघूतर भाग घेऊन. लगेच समीरला फोन केला. म्हटलं, ‘मी भाग घेते.’ समीर खूप खुश झाला. मी त्याला म्हटले, ‘अरे, संघातला तिसरा खेळाडू कोण?’ तर तो होता बंगलोरचा कुटाप्पा. सत्तावीस वर्षांचा. समीरने त्याला इंटरनेटवर शोधला होता. कुटाप्पा आपला व्यवसाय ‘प्रवासी’ असेच सांगतो. भरपूर सायकलिंग व ट्रेकिंग करत असतो. एकमेकांना आधी न ओळखणारे, वेगवेगळ्या शहरात राहणारे वेगवेगळ्या वयोगटातील आम्ही संघ बनवून धाडसी क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेत होतो. एकदाची आमची अनोखी टीम तयार झाली.
१ फेब्रुवारी २००४ ला NEF च्या ऑफिसमध्ये ग्रुप लीडरबरोबर मीटिंग झाली. एकंदर स्पर्धेचे स्वरूप, सायकलिंग व ट्रेकिंग मार्गाचे नकाशे दिले. माझी नियमित जिम तसेच फिरण्याचा व्यायाम व योगासने मात्र चालू होती. त्यामुळे शारीरिक क्षमतेबद्दल मला विश्वास होता, व माझा Endurance चांगला आहे, हे मला माहीत होते. तरी Adventure Race या वयात म्हणजे जरा जास्तच होते. कारण बरोबरचे स्पर्धक पुण्याच्या एन.डी.ए व नाशिकच्या एन.सी.एफ. मधले साधारण १८ ते २५ वयोगटातले होते. परंतु वेगळा अनुभव घ्यायचा म्हणून या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे मी ठरविले. या काळात नुपूर शिरवळला हॉस्टेलला होती व अदिती अंदमान ट्रिपला जाणार होती.
मंगळवारी ३ फेब्रुवारीला कुटाप्पा बंगलोरहून आला. समीर मुंबईहून आला. आम्ही तिघे पहिल्यांदा ३ फेब्रुवारीला रात्री आमच्या घरी भेटलो. जेवताना स्पर्धेसंबंधी चर्चा झाली. बरोबर काय घ्यायचे व तिघांचे पहिले व शेवटचे एकत्र सायकलिंग व ट्रेकिंगचा प्रॅक्टिस सेशन बुधवारी पहाटे करायचे असे ठरले.
बुधवारी पहाटे सायकलने आळंदी रोडला दिघीपर्यंत गेलो. तेथेच मागे असलेल्या टेकड्यांवर ट्रेकिंग करून परत सायकलने घरी आलो. बरोबर खायचे कोणते पदार्थ घ्यायचे हे ठरवून आणण्यात व सायकल नीट तयार करून घेण्यात गुरुवार गेला.
उद्या स्पर्धेचा दिवस. थोडी धाकधूक होत होती. शुक्रवारी सकाळी सायकल कारमध्ये घातली व निघालो. शेखर सोडायला आला होता. कटारिया हायस्कूलचे ग्राऊंड सायकल व रकसॅक घेतलेल्या तरुण तरुणींनी फुलून गेले होते. सह्या झाल्या. त्यांनी दिलेला ‘पोंचू’ घातला. पोंचू सतत घालणे आवश्यक होते. एकदाचे फ्लॅग ऑफ झाले. येथून NDA पर्यंत सायकलवर जायचे होते. तेथून स्पर्धा सुरू होणार होती. तेथे दोन गट रायफल शूटिंगला व दोन गट तेथील जंगलामध्ये सायकलिंगला गेले. सायकलिंग १० कि.मी. होते. पण रस्ता जंगलातील असल्यामुळे दगडधोंड्यांनी भरलेला होता. येथे माझी सायकल एका दगडावरून जबरदस्त सटकून हँडल वाकडे झालेले आठवतंय. पण तेवढ्यावरच भागलं कारण हँडल सरळ करून सायकलिंग पूर्ण करता आले. खऱ्या रायफलवर खरे सैनिक आपल्याला रायफल शूटिंग शिकवतात. प्रत्येकाला पाच चान्स असतात. बंदूक, तीसुद्धा खरी, पहिल्यांदाच हातात धरत होते. मला प्रथम फुलनदेवीच आठवली. ते झाल्यावर सायकलिंग करत पिकॉकबेला जायचे होते. तेथे नौकानयन केले. मग मात्र ४८ किलोमीटर डोंगरातील सायकलिंग चालू झाले. कुडजे, मांडवी, काठवडे, वरसगाव, कडवे, शिरकोली करत आम्ही थानगाव या कँपसाईटवर संध्याकाळी सहा वाजता पोहोचलो. हा पूर्ण भाग खूप चढ-उताराचा भयानक वळणांचा खडबडीत व कच्च्या सडकेचा होता. उताराला ब्रेक लावूनसुद्धा ३० किलोमीटरच्या वेगाने पुढे जात होतो. ब्रेक दाबून अक्षरशः हात दुखायला लागले. उन्हाचा खूप त्रास झाला. जेवण, पाणी पिण्याकरताही फारसे कुणी थांबत नव्हते. कारण थोडाही वेळ कोणाला वाया घालवायचा नव्हता. कँपसाईट सुंदर होती. पानशेत धरणाच्या काठावर होती. आता फक्त पंधरा मिनिटे, ‘डेड टाईम’ मोकळा होता. यामध्ये आवरून पुढच्या ट्रेकला जायचे होते. रकसॅकबरोबर घेऊनच देवराज जंगलात ट्रेकला निघालो. अंधार पडलेलाच होता. रस्त्यावरील पांढऱ्या निशाणांच्या आधाराने रस्ता शोधत जायचे होते. बॅटरी बरोबर घ्यायला परवानगी होती. पण तो उजेड पुरेसा नव्हता. बरेच अंतर चाललो, तरी रस्ता संपत नव्हता. त्यात समीरच्या पायात गोळे यायला लागले. माझा पाय पण एक दोनदा सणसणीत मुरगळला. काही ठिकाणी मातीच्या भुसभुशीत टेकड्यावर छोटीशी पाऊलवाट होती त्यावरून घसरून खाली खड्डयात पडायची फार भीती वाटत होती. शेवटी एकदाचा चेक पॉईंट आला. तोही उंच डोंगरावर होता. ट्रेक संपवून रात्री ११ वाजता कँपसाईटवर आलो. बॅग ठेवून लगेच नदी ओलांडायला गेलो. दोन्ही काठांच्यामध्ये पाण्यावर दोरी बांधलेली होती. दोरी धरून किंवा पोहत पलीकडे जायचे होते. पाणी खोल होते. बूट व कपड्यांसकट नदी ओलांडली व पलीकडच्या टेकडीवरून ओल्या कपड्यासकट चालत येऊन एकदाची कँपसाईट गाठली. कपडे बदलून रात्री १२ वाजता जेवायला बसलो. पोळीभाजी कोरडी झाली होती. खाववेना. मग बिस्किटे, बदाम, बेदाणे असे खाऊन पाणी पिऊन जेवण संपवले. स्लिपिंग बॅगमध्ये आकाशातल्या चांदण्या बघत झोपण्याचा प्रयत्न केला. पहिला दिवस बऱ्यापैकी दमछाकीचा, धाडसाचा ठरला होता. पण समाधानही वाटत होते. कारण बऱ्याच टीम्स दमछाक झाल्यामुळे, डिहायड्रेशन झाल्यामुळे व नियमांचा भंग केल्यामुळे स्पर्धेतून बाद झाल्या होत्या.
दुसरा दिवस उजाडला. काळ रात्री जंगलातून ट्रेक करताना एक-दोनदा पाय मुरगळला होता. पण आज त्याचा काही त्रास नव्हता. सकाळचे विधी आवरून परत सगळे कोरडे अन्न खाऊन व पाणी पिऊन नाष्टा उरकला. अर्थात चहा-कॉफी नाहीच. काल आलो त्याच मार्गाने सायकलिंग करत जायचे होते. काही अंतरानंतर मार्ग बदलून वेल्हे नॉचकडे जायचे होते. कालचे उतार डोळ्यांसमोर आले. आज ते चढ बनून दैत्यासारखे डोळ्यांसमोर उभे राहिले. साडेनऊ वाजता सगळे स्पर्धक एका रांगेत उभे राहिले. लांब ठेवलेल्या रकसॅक पळत जाऊन घेतल्या व लगेच सायकलिंग सुरु केले. पहिलाच मोठा चढ, मातीचा जाड थर, ऊन खूप वर आले होते. चढ-उतार चांगलेच दमवत होते. समीर व कुटाप्पाला वाटले की मी बहुतेक आज स्पर्धा सोडणार. पण मी स्पर्धा पूर्ण करण्याच्या जिद्दीने पुढे जात राहिले. आमच्याबरोबर सतत एक अॅम्ब्युलन्स होतीच. काहींना डिहायड्रेशन झाल्यामुळे अॅम्ब्युलन्समध्ये ड्रिप लावावी लागली. आजचा दिवस जरा अवघडच वाटत होता. वेल्हे नॉचपर्यंत ६ कि.मी.चा उभा चढ आहे. काही वेळा चढावर समीर व कुटाप्पाला माझी सायकल मागून ढकलावी लागली. वेल्हे नॉच नंतर भयानक वळणे, उतार, खडबडीत रस्ता होता. वेल्हे गावानंतर सायकलिंग संपले.
दुपारचे तीन वाजले होते. खूप भूक व तहान लागली होती. फक्त १० मिनिटे वेळ होता. त्या वेळात सायकल ट्रकमध्ये चढवून, जेवून पुढच्या ट्रेकला निघालो. थानगावच्या कँपवर मागच्या डोंगरातून जायचे होते. दमलो तर होतोच. शेवटी एके ठिकाणी, नदीकाठी थांबून लिंबाचे सरबत करून प्यायलो. खूप बरे वाटले. पांढरी निशाणे बघत रस्ता शोधत निघालो. पुढे मागे एखादा ग्रुप होता. अंधार पडायला लागला होता. बॅटऱ्या काढल्या. अनोळखी जंगलातून ठेचकाळत, पडत मार्गक्रमण करत होतो. या मार्गामध्ये वस्ती जवळ जवळ नाहीच. साधारण ८ वाजता कँपवर पोहोचलो. चेक पॉईंटवरची सही झाली. फक्त १५ मिनिटे मोकळा वेळ होता. लगेच नदी ओलांडायला जायचे होते. बॅग ठेवून लगेच तिकडे गेलो. आज नदी ओलांडून नदीतूनच परत यायचे होते. पाण्यामध्ये उतरल्यावर बरे वाटले. दिवसभराचा घामपण धुवून गेला. रिव्हर क्रॉसिंग झाल्यावर मात्र कपडे बदलून लगेच जेवायला बसलो. आज कुटाप्पाने नवीन डिश तयार केली. पोह्यामध्ये गुळपाणी घालून खायचे. बरे लागले. गुळाची पोळी होतीच. खूप गोड गोड झाले होते. ओझे नको म्हणून चिवडा, चकली हे पदार्थ घेतले नव्हते याचा आता पश्चाताप होत होता. आज कँपसाईटवर गर्दी कमी होती. बऱ्याच टीम्स बाद झाल्या होत्या. शिवाय हौशी व महाविद्यालयीन गटाच्या स्पर्धा संपल्या होत्या. त्या स्पर्धा दीड दिवसाच्याच होत्या. रात्रीचे नऊ वाजले होते. सरळ स्लीपिंग बॅगमध्ये शिरून झोपी गेलो. रात्री साडे दहा वाजता शिटी वाजली. चला, नाईट नॅव्हीगेशनला जायचंय. फार कष्टाने स्लीपिंग बॅगमधून बाहेर आले. रकसॅक तयार केली. उंच डोंगरावर लाईट दिसत होता. तेथे जायचे होते. तेथून पुढच्या सूचना मिळणार होत्या. प्रत्येक चेक पॉईंटला सही होती. रस्ता आपला आपणच शोधायचा होता. रस्ते दाखवणारी पांढरी निशाणे नव्हती. चला, वानरसेना पाठीवर रकसॅक घेऊन निघाली. एनडीएचे स्पर्धक अक्षरशः पळत सुटायचे. भुसभुशीत डोंगर, उभा चढ, रात्रीची वेळ, पौर्णिमा होती. पण जंगलामध्ये झाडांमधून चंद्रप्रकाश फारसा येत नव्हता. झाडांमधून मार्ग काढत, ठेचकाळत, खड्डयामध्ये पडत मार्ग काढत होतो. उभ्या चढावर पाय घसरत होते. धरून चढावे असे काहीच नव्हते. छोटी झुडपे, त्यांना आधाराला धरायला जावे तर तीच मुळासकट हातात येत होती. समीर वरून सांगत होता, ‘रांगत ये’. मनात म्हटलं, ‘अरे, रांगणं तर कधीच विसरलेय मी!’ त्यात माझे हेल्मेट निघाले. सारखे डोळ्यावर यायला लागले. तसेच धडपडत उभे राहात ते नीट घातले. एकदाची पटापट रांगत चढ चढले व पहिल्या लाईटपाशी पोहोचले. सही झाली. तेथून दुसऱ्या लाईटच्या दिशेने निघालो. तेथे पोहोचून सही घेतली. तेथून तिसऱ्या टेकडीवरचा लाईट दाखवला. चला, हे ही करू, असे म्हणून तेथेही पोहोचलो. परत थानगावच्या कँपसाईटवर यायला रात्रीचे एक वाजून वीस मिनिटे झाली होती. कपड्यांमध्ये खूप काटे शिरले होते. ते काढले. पाणी प्यायले आणि स्लिपिंगबॅग काढून झोपून गेले. उघडे मैदान व मागच्या बाजूला डोंगर, पुढे पानशेत डॅम, त्यामुळे खूपच थंडी वाजत होती. रोज रात्री मला कँपसाईटवर बघून आयोजकांना आश्चर्य व कौतुक वाटत होते. कॅप्टनकमलसिंग म्हणून एनडीएचे ऑफिसर होते. हे उत्तरध्रुवावर पॅराशूटने यशस्वी उतरणारे पहिले भारतीय आहेत. त्यांचा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या हस्ते खास सत्कार झालेला आहे. ते आयोजकांमध्ये होते. ते दुसऱ्या दिवशी मुद्दाम माझ्याजवळ येऊन मला म्हणाले, ‘मॅडम तुमच्या प्रयत्नांना आम्ही दाद देतो.’ We appreciate your efforts. मला पण दोन दिवस पूर्ण करू शकल्याचे समाधान व एकच दिवस राहिला म्हणून बरं वाटत होते. Enduro-3 सारख्या धाडसी क्रीडा स्पर्धांमध्ये शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक क्षमतेचा कस लागतो.
आज ८ फेब्रुवारी. स्पर्धेचा शेवटचा दिवस. भालवाडी या गावात बोटीने सोडले. (नशीब पोहायला नाही लावले.) तेथे चेक पॉईंटवरसही घेतली. कोशीमघर गावात गेलो. त्या गावातूनच डोंगराकडे रस्ता जातो. तेथून ट्रेकिंग सुरु झाले. चांगलाच चढ होता. तो चढून गेल्यावर तेथून पठारावरचे गाव दिसले. तेथे जाऊन सही घेतली. परत त्याच रस्त्याने कोशीमघर गावात आलो. दोन अडीच तासांचा दमछाक करणारा ट्रेक होता. पाणी संपलेले होते. गावातून पाणी घेतले. खूप भूक लागली होती. पण बरोबर आणलेले पदार्थ खायची इच्छा नव्हती. तसेच पाणी पिऊन निघालो. येथून पानशेत वॉटर स्पोर्टस सेंटरपर्यंत चालत जायचे होते. अंतर १५ कि.मी. होते. सकाळचे ११ वाजले होते. ऊन पण मी म्हणत होते. चालायला सुरुवात केली. अंतर संपता संपत नव्हते. या रस्त्यावर सावली अजिबात नाही व कडक ऊन. सहा-सात कि.मी. चालून झाल्यावर. मला डीहायड्रेशनचा त्रास व्हायला लागला. पोटामध्ये कसेतरी व्हायला लागले. तोंड कोरडे पडू लागले. मग मात्र थांबून खजूर खाल्ला व पाणी प्यायले. जरा बरे वाटले. या स्टेजला मला स्पर्धा सोडायची नव्हती. NEF ची गाडी आमच्या मागे होतीच. पण मला स्पर्धा पूर्ण करायची होती. त्यामुळे मी त्यात बसायचा प्रश्नच नव्हता. पायाला झालेले ब्लिस्टर्स प्रत्येक पावलागणिक दुखत होते. तसेच अंतर कापत होते. कुटाप्पा पुढे होता. मधे मी आणि मागे समीर होता. आज तो पण चांगलाच दमला होता. एका वळणावर चक्क पानशेत वॉटर स्पोर्ट सेंटर एक किलोमीटर अशी पाटी दिसली अन् हुश्श झालं. आता मात्र अजून भरभर चालायला लागलो. थोडे पुढे गेल्यावर NEF चे स्वयंसेवक आले. म्हणाले, ‘मॅडम फक्त ३०० मीटर रन’ आणि मी चक्क पळत सुटले. आणि एकदाची Adventure Race पूर्ण केली. थकवा तर आला होता. पण स्पर्धा पूर्ण केल्याच्या अतीव समाधानाने आनंदाश्रू येत होते.
रविवारी ८ फेब्रुवारी रोजी रात्री कटारिया हायस्कूलमध्ये अतुल किर्लोस्करांच्या हस्ते बक्षीस समारंभ झाला. आमच्या व्यावसायिक गटामध्ये २३ पैकी फक्त ११ संघांनी स्पर्धा पूर्ण केली NDA व NCF मधील स्पर्धकांनी जास्तीत जास्त बक्षीस मिळवली. सर्वात वयाने जास्त असलेल्या स्पर्धकाने स्पर्धा पूर्ण केली तर त्यासाठी एक ट्रॉफी व एक हजार रुपये बक्षीस होते. ते मला मिळाले. टाळ्यांच्या गजरातच मी ते बक्षीस स्वीकारले. आयोजक व अनेक स्पर्धकांनी मुद्दाम भेटून माझे अभिनंदन केले. अनेक स्पर्धकांनी विचारले, ‘मॅडम, तुम्ही ही धाडसी स्पर्धा कशी काय पूर्ण करू शकलात?’ मला वाटते, नियमित व्यायाम, योगासने, फिरणे, ध्यान, मुख्य म्हणजे स्पर्धा पूर्ण करण्याची जिद्द, यामुळे स्पर्धेसाठी फारशी पूर्वतयारी न करताही स्पर्धा पूर्ण करू शकले. मला स्वतःला मी या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे व स्पर्धा पूर्ण करण्याचे धाडस दाखवले याबद्दल सविनय अभिमान वाटतो.
काही वर्षे मी मराठी भाषेतून अॅक्युप्रेशरचे कोर्सेस घेतले. शेखर अनेक वर्षे अॅक्युप्रेशर कोर्सेस घेत होता. पण तो इंग्लिश भाषेतून घेत होता. अक्युप्रेशरचा अभ्यास मी शेखरच्या मार्गदर्शनाखाली केला. या पंधरा दिवसांच्या कोर्सचे नियोजन करताना अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. या कोर्समध्ये अॅक्युप्रेशर शिकण्यासाठी गर्दी असायची. कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून गृहिणी, शिक्षिका, प्राध्यापक, व्यावसायिक स्त्री-पुरुष असे अनेकजण असायचे. क्लासमध्ये शिकवायचा माझा पहिला अनुभव. प्रत्येक दिवसाच्या क्लाससाठी भरपूर तयारी करावी लागायची. पण मजा यायची. या क्लासमुळे मला कधी न मिळालेला शिकवण्याचा आनंद व अनुभव मिळाला. जवळजवळ तीन वर्षे अॅक्युप्रेशर कोर्स घेतले. नवक्षितिजचे काम वाढल्यानंतर मी हे कोर्सेस घेणे बंद केले.
मला पदव्युत्तर शिक्षण घ्यायची फार इच्छा होती. पण काहीना काही कारणाने ते मागे पडत होते. २००६मध्ये असे समजले की, बेसिक पदवी असली, तरी तुमचा १५ ते २० वर्षांचा व्यावसायिक अनुभव असेल तर तुम्हाला पीएच.डी. करता येते. मी या संधीचा फायदा घ्यायचा ठरवले व टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून आयुर्वेदामधील विषय घेऊन पीएच.डी. करता येते का, याची चौकशी केली. त्यांनी मला वाघोली सेंटर घेऊन पीएच.डी. करता येईल, असे सांगितले. मी जरूर ते सोपस्कार पूर्ण करून २००६ साली एकदाचा पीएच.डी. ला प्रवेश घेतला. या वेळेपर्यंत नुपूरचा व्हेटरनरी मेडिसिनचा प्रवेश झालेला होता व त्यामुळे ती शिरवळला वसतिगृहात होती. नवक्षितिजची कार्यशाळा सुरु झाल्यामुळे अदितीचे रुटीन व्यवस्थित सुरु होते. २००७ सालानंतर अदिती नवक्षितिजमध्ये राहायला गेली, पण नवक्षितिजची जवळजवळ पूर्ण जबाबदारी माझ्याकडे आली. आठवड्यातून दोनदा दुपारी मला पीएच.डी.च्या कामासाठी वाघोलीच्या आयुर्वेद कॉलेजमध्ये जावे लागायचे. घर, क्लिनिक व नवक्षितिजची जबाबदारी या सगळ्याचा समन्वय साधताना जरा कसरतच होत होती. पण २०११ साली जेव्हा पीएच.डी. मिळाली तेव्हा या सगळ्या कसरतीचे सार्थक झाले असे वाटले. पीएच.डी. थिसीसमध्ये स्टॅटिस्टिकल अॅनालिसिस करून रिझल्ट लिहिताना शेखरची चांगलीच मदत झाली.
माझे जिम, योगासने, प्राणायम व विपश्यना ध्यान नियमित चालू असते. रविवारचा दिवस फक्त घरासाठी राखीव ठेवते. मला स्वतःला घर व कपाटे आवरायला, बागेत काम करायला मनापासून आवडते. घरामधील नको असलेल्या वस्तू, कपडे त्या निमित्ताने बाहेर निघून घर स्वच्छ होते. मला वाटते स्त्री कितीही शिकलेली, मोठ्या हुद्द्यावर असलेली वा खूप पैसे कमवत असलेली असली, तरी घराची व घरातील व्यक्तींची विशेषतः मुलांची काळजी घेणे ही तिची नैसर्गिक मानसिक गरज असते. यामध्ये स्त्रीला अतीव समाधान मिळते व हे करता आले नाही, तर आयुष्याला काहीतरी कमतरता आहे असे वाटते. त्यामुळे स्त्रियांनी आपल्या या भावनेला समजून घेऊन, जरूर न्याय द्यावा यामुळे समाधानी तृप्त आयुष्य जगता येते.
घर, नातेवाईक व नवक्षितिज याचा समतोल व्यवस्थित सांभाळू शकले, याचे मला समाधान आहे. माझा असा अनुभव आहे की, आपण जर नात्यांमध्ये समतोल बरोबर साधला तर घरच्यांकडून आपण करत असलेल्या व्यावसायिक व सामाजिक कामाला सहकार्य व प्रोत्साहन नक्की मिळते. पण ते करायची अंतर्गत उर्मी स्वतःलाच हवी व ती असेल तर सगळ्यांकडूनच मदत नक्की मिळते.
मुली लहान असताना घर व क्लिनिक या मध्येच मी जास्त रमायची. सायकलिंग व ट्रेकिंगला गेले तरी ते संपल्यावर लगेच माझे घर व क्लिनिकचे रुटीन सुरु व्हायचे. मैत्रिणींना फोनसुद्धा मुली झोपल्यावर करत असे, कारण घरी आल्यावर पूर्णवेळ मुलींना द्यायला मला आवडायचे. आतासुद्धा अदिती घरी आल्यावर पूर्णवेळ अदिती करताच ठेवलेला असतो. तिला आवडते ते स्पॅगेटी, सूप सारखे पदार्थ करायला मला मनापासून आवडते व अदितीपण हक्काने करून घेते. अदितीबरोबर लहान होऊन चेष्टा, मस्करी, दंगा करायला मला फार मजा येते.
सध्या पूर्णवेळ नवक्षितिजच्या कामामध्ये मग्न असले, तरी मी माझे वेगळे व्यक्तिमत्त्व जपते. घरी आल्यावर सारखे नवक्षितिजबद्दल बोलणे टाळते. अधूनमधून शेखरबरोबर देशविदेश यात्रा करते. तसेच नातेवाईक व मैत्रिणींबरोबर ट्रिपला जाणे, त्यांना अधूनमधून जाणे, शेजाऱ्यांना भेटणे मला मनापासून आवडते. मोकळ्या वेळेत सिनेमा बघणे, वाचन, लिखाण, बागकाम, टी.व्ही. बघणे चालू असते. वेळेचे नीट नियोजन केले तर हे सगळे जमते.
लहान असताना मी मराठी भाषेतील पुस्तके सुट्ट्यांमध्ये वाचलेली होती. आई पुण्याला आली की मराठीमधील प्रसिद्ध लेखकांची पुस्तके आवर्जून विकत घेऊन आम्हाला वाचायला देत असे. रीडर्स डायजेस्ट दर महिन्याला यायचे. एवढेच इंग्लिश वाचन व्हायचे. लग्नानंतर इंग्लिश पुस्तकांचे दालन माझ्यासाठी खुले झाले. आश्चर्य म्हणजे मी पहिले इंग्लिश पुस्तक ‘अॅन रँड’ या लेखिकेचे ‘फाऊंटन हेड’ वाचले. हे बरीच पृष्ठसंख्या असलेले व क्लिष्ट पुस्तक आहे. या नंतर अनेक प्रख्यात इंग्लिश लेखकांची पुस्तके वाचली. आत्मचरित्र या लेखन प्रकारात मला प्रसिद्ध व्यक्तींची आत्मकथेने वाचायला आवडतात. त्यांच्या आयुष्यातील काही घटनांमधून आपल्यालाही प्रेरणा मिळते. सध्या परत मराठी पुस्तकांचे वाचन सुरु केले आहे.
नवक्षितिजमध्ये काम करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशावेळी आत्मविश्वास, मुलांना आनंदी आयुष्य द्यायची प्रामाणिक भावना व संवेदनशीलता मिळून या आव्हानांचा यशस्वी सामना करता येतो. खूप धीर, बुद्धीची तल्लखता व मनाचा समतोल ठेवून काम करावे लागते. काम होत नाही तोपर्यंत चिकाटीने काम करत राहायचे. सतत प्रयत्न करत राहायचे. अपयश आले तर हाही एक अनुभव, या अनुभवातून बरेच शिक्षण झाले, ही भूमिका ठेवली की निराशा येत नाही. महत्त्वाचे म्हणजे यातूनच आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त होतो. नवक्षितिजच्या चांगल्या कामाची पावती म्हणून अनेक मानसन्मान मिळत असतात. आमचे काम योग्य दिशेने चालले आहे, याची ती पावती असते. यामुळे काम करायला अजून आंतरिक ऊर्जा मिळते.
माझ्या समांतर आयुष्यामध्ये नुपूरचे शार्दुलशी लग्न ही फार महत्त्वाची, हळवी व तितकीच आनंददायी घटना. तिचे व शार्दुलचे आयुष्य आनंदात चालू आहे, ही फार समाधान देणारी बाब आहे.
माझ्या दोन्ही मुली आपापल्या आयुष्यात आनंदाने स्थिरावलेल्या आहेत. हे बघणे खूप आनंददायी आहे. सध्या नवक्षितिज हा धाडसी उपक्रमच सुरु असल्यामुळे इतर धाडस करायची फारशी इच्छा मला होत नाही, असे दिसतंय.