मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. लोक त्यांना बापू म्हणत. अहिंसात्मक - असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या याच विचाराने आज संपूर्ण जग प्रेरित झाले आहे. त्यांचा जन्म दिन ( २ आँक्टोबर ) हा जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा होतो. गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विन्स्टन चर्चिल यांनी १९३० साली त्यांची "अर्धनग्न फकीर" म्हणून निर्भत्सना केली. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले. त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधींनी हिंदू-मुस्लीम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्न केल. त्यांची अखेर मात्र वेदनादायी झाली. एका माथेफिरूने त्यांची हत्या केली. गांधीना मारणारे गांधीवाद संपवू शकले नाहीत. गांधी आजही जिवंत आहेत. सत्य , अहिंसा , सत्याग्रह म्हणजेच गांधी ! आज असलेल्या १५१ व्या महात्मा गांधी ह्यांच्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन
















