भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : ३५ ठिकाणी ईव्हीएममधील बिघाडामुळे मतदान रद्द वेब महाराष्ट्र टीम : लोकसभेच्या ४ आणि विधानसभेच्या १० जागांवरील पोटनिवडणुकीसाठी सध्या देशात मोठ्या सुरक्षाव्यवस्थेत मतदान सुरु आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांवर इव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात १००हून अधिक मतदान केंद्रावरील मशिनमध्ये बिघाड झाल्याची तक्रारी समोर आल्या. अखेर भंडारा-गोंदियात ३५ ठिकाणी मतदान यंत्रातील बिघाडामुळे मतदान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर भंडारा-गोंदियात 450 ईव्हीएम बंद असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भाजपकडून जाणूनबुजून ईव्हीएम बंद पाडण्याचा प्रकार करण्यात येत असल्याचे गंभीर आरोप त्यांनी केला आहे. फेरमतदान घेण्याची आंबेडकरनिवडणूक आयोगाकडे केली आहे. भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला २८ मे रोजी सकाळी ७ वाजता पासून सुरूवात झाली. भंडारा-गोंदिया मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १३.९० टक्के मतदान झाले आहे. ईव्हीएम मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे मतदानावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत ग्रामीण भागांत चांगला तर शहरी भागांत संथ प्रतिसाद पाहायला मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा येथील बूथ क्र. २४९ मधील मशीनमध्ये बिघाड झाल्याने फक्त दोनच जणांना आतापर्यंत मतदान करता आले आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात ४६ गावांचा मतदानावर बहिष्कार टाकला आहे. नक्षलग्रस्त भिवखिडकी नवेगाव बांध येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद असल्याचे वृत्त समोर येत आहे. तर तुमसरमध्ये खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ११ ईव्हीएम बंद आहेत.










