Listen this story of Aaradhana Kulkarni. Voiceover by Leena Kulkarni Ek hoti vedi chiu एक होती वेडी चिऊ —-आराधना कुलकर्णीएक होती चिऊ आणि सोबत चिमणोबाही होताच. पण ही काही नेहमीची गोष्ट नाही. या चिऊचे घर मेणाचे नव्हते की शेणाचेही नव्हते. साधे, वाळक्या काड्यांचेच होते. चिऊताई मात्र वेगळ्याच स्वभावाची होती, म्हणून तिची गोष्ट सरळसाधी नव्हती. काय झाले, की तिच्या घरात ती दोघेच होती. कडूलिंबाच्या झाडावर त्यांचे छोटेसे घरटे होते. मग आपल्या चिऊताईला बाळ हवेसे वाटू लागले. चिमणोबाला मात्र वाटले की एवढी काय घाई आहे? आपलं घरटं छोटं आहे. त्यात पिल्लं कशी राहणार? पण चिऊताई ऐकून घ्यायला तयारच नव्हती मुळी. शेवटी चिमणोबाने हार मानली. मग चिऊताईने एकदोन नाही, तर चांगली चार अंडी घातली. चिमणोबा मात्र चिंतेत पडला. पावसाळा आलाय जवळ. जास्तीचा चिमणचारा साठवायचा कुठे ? शेजारच्या कावळे आणि घारींपासून कसं वाचवायचं पिल्लांना? चिऊताईचा बाप्पावर विश्वास होता. ती म्हणायची, "अरे जो चोच देतो तोच चारा देतो आणि जो जन्माला घालतो तोच रक्षण करतो. उगीच का चिंता करतोस?" मग चिमणोबा शांतच राहू लागला.काही दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर आली. ती गोजिरवाणी रुपे बघून चिऊताई धन्य धन्य झाली. मग दोघांपैकी एकाने घरट्यात थांबायचे आणि एकाने बाहेरची काम करायची असे ठरवून टाकले. जोपर्यंत पिल्ले उडू शकत नव्हती तोपर्यंत ते करणे गरजेचे होते. आपली चिऊताई आता चिऊआई झाली. पिल्लांचे करण्यात वेळ कुणीकडे निघून जाई हे देखील तिला समजत नसे.हळूहळू बाळे घरट्यातून बाहेर डोकावू लागली. पंख हलवू लागली. कसे उडायचे,दाणे कसे टिपायचे, किड्यामुंग्यांवर कसा नेम धरायचा सगळं त्यांनी आईबाबांकडून पटकन शिकून घेतले. हुशारच होती ती! त्यांची कामे ती स्वतंत्रपणे करू लागली.काही दिवसांनी चिऊआईच्या मनात आले की आता मोठे घरटे बांधायला हवे. ती बाळांना म्हणाली," बाळांनो तुम्ही आता मोठे झालात. आपण एक मोठं घरटं बांधू. तुम्ही पण चांगल्या मजबूत काड्या शोधून आणा बरं का!" बाळे अर्थातच हुशार होती. ती एकत्र बसली. काहीतरी ठरवले. मग आईला म्हणाली," अगं आई, नाहीतरी आता घरटं बांधायचं ठरवलं आहेस तर एकच कशाला? आम्ही आमची स्वतंत्र घरटी बांधतो. या घरात तुम्ही दोघं आरामात राहा. आम्ही आमच्या नव्या घरट्यात जाऊ." ते ऐकून चिऊआईला धक्काच बसला. खूप वाईट वाटलं. ती चिमणोबाजवळ खूप रडली. त्याने तिला धीर दिला. तो म्हणाला," बरोबरच आहे गं त्यांचं. जाऊ दे त्यांना." मग चिऊताईने स्वतःला सावरले. तिने पिल्लांना घरटी बांधायला मदत केली. बाजूच्या झाडावर चार घरटी तयार झाली. ते स्वतंत्र राहू लागले. आपापल्या आवडीने त्यांनी चिमण्या आणल्या. त्यांचे संसार सुरू झाले.चिऊआई त्यांच्या सुखात आनंद मानत होती. आठवण आली की एकेकाकडे जायची. त्यांना मात्र मूळ घरट्याकडे यायला वेळच नसायचा. ती भेटायला गेली की खूप गोड चिवचिवाट व्हायचा. चिऊआईला वाटायचं की कोणीतरी म्हणावे, रहा ना आई एक दोन दिवस माझ्याकडे. पण तसे व्हायचे नाही. खरेच त्यांची घरटी लहानच होती, मग मन मोठे असून तरी काय उपयोग? चिऊताई भेटून आली की उदास व्हायची. फांदीवर बसून आसवे गाळायची.होता होता काही काळ गेला. चिऊताई व चिमणोबा थकू लागले. पंखातले बळ कमी होऊ लागले. कसेतरी ते दिवस कंठू लागले. त्यांना वाटायचे आपल्या बाळांनी यावे, आपली विचारपूस करावी, आपल्यासाठी चारा आणावा. पण खरंच त्यांना वेळच मिळत नव्हता कारण त्यांच्याही जबाबदाऱ्या वाढत होत्या.इकडे या दोघांची ही अवस्था शेजारचे काऊदादा घारुताई आणि राघूदादा यांच्या लक्षात आली. त्यांना या दोघांची दयाच वाटली. चार चार पिल्ले असून त्यांना बघणारे कोणीच नव्हते.. मग त्यांनीच यांच्याशी मैत्री केली. स्वतःचा घास ते यांना भरवू लागले. चिऊआई राघूदादाशी अगदी मनमोकळे बोलत असे. चिमणोबा तटस्थ राही. तो कोणाच्याच विरोधात बोलायचा नाही.एके दिवशी राघूदादाला राहावलेच नाही तो तिच्या तो चिऊच्या पिल्लांकडे गेला. त्यांना सर्व परिस्थिती समजून सांगितली पण काही उपयोग झाला नाही. त्यांचे असे म्हणणे पडले की, आता आम्ही तरी काय करणार? आम्हालाही आमचे संसार, आमची बाळं आहेतच की. राघूदादा निराश होऊन परत आला. चिऊ आतुरतेने त्याची वाट पाहत होती. पण तो काहीच बोलेच ना, तसे तिच्या सारे लक्षात आले. डोळ्यातून टप टप अश्रू पडू लागले. थोड्या वेळाने राघूदादा मिठास वाणीने तिची समजूत घालू लागला." ए चिऊताई, तू वेडी का खुळी? अगं मुलाबाळात इतका गुंतवून घ्यायला आपण माणसं आहोत का? आपण तर पाखरं आहोत.तू आणि चिमणोबाही स्वतंत्रच राहिलात ना? अगं आपल्यात असंच असतंहे कसं काय विसरलीस तू? हं, आता आलं लक्षात. हा सगळा या कॉलनीतल्या झाडावर राहण्याचा परिणाम आहे. इथून आणि त्या लाईटच्या तारेवरून समोरच्या घरात पाहत असतेस सारखी. त्यांच्या घरातल्या गोष्टीत चोच खूपसून माहिती करून घेतेस. आणि शिवाय घरातल्या टीव्ही सिरीयल्सही पाहतेस. त्याचेच आहेत हे परिणाम. माणसांच्या सगळ्याच गोष्टी तऱ्हेवाईक. हेवेदावे, भांडणे, रुसवे फुगवे, कपटकारस्थानं, स्वार्थीपणा,आणि सारखं रडणं. त्यांना बघता बघता त्यांचा स्वभावही उचललास तू त्यांचा.अगं ते आता आपल्यासारखं स्वच्छंदी वागत आहेत, आणि तू कुठे त्यांच्यासारखं व्हायला बघतेस? जरा त्या जगातून बाहेर ये. पाखरांच्या जगात ये. चल, हे घरटं सोडून दे पाहू. या कॉलनीतल्या झाडावर नकोच राहूस. रानात जाऊन नवीन घरटं बांध. अगदी तुमच्यापुरतं. कुणाकडे जाऊ नका, कुणाला बोलवू नका. कुणात गुंतू नका. दोघंच रहा ना मजेत!" राघूदादाचे बोलणे चिमणोबा मान डोलवत ऐकत होता. चिऊताईलाही ते पटले.' अरेच्चा, खरंच की! मी माणसांसारखाच विचार करतेय. आम्ही ज्यांना जन्म दिला, मोठं केलं, त्यांनी आम्हाला सांभाळलं पाहिजे हे माणसांसारखे हिशेब मी का मांडू लागले? त्यांचं आणि पाखरांचं जगच वेगळं आहे की!' या विचारांनी तिचे दुःख निवळले. स्वतःलाच टपली मारून घेत ती खुदकन प्रसन्न हसली. सगळे मळभ विरुन गेले.तिला मोकळे मोकळे वाटले.'शुभस्य शीघ्रम् ' म्हणत तिघे रानाच्या दिशेने झेपावले.Vyakta Avyakta