एसटी संप आणि राजकीय घडामोडी.
एसटी महामंडळाचे शासनात विलिणीकरण हा प्रश्न सुटणार नाही हे सर्वश्रूत आहे तो एका दिवसाचा एव्हाना कमीत कमी वर्षभर तरी न सुटणारा प्रश्न आहे.
मध्य मुंबईत गिरणी कामगारांचा संप आणि सध्या एसटी कर्मचारी संप यात काही फरक नाही. त्यावेळी संप जसजसा चिघळत गेला, तसा उग्र व हिंसक रुप धारण करता झाला. पैशांच्या तंगीअभावी ज्या गिरणी कामगारांना कामावर हजर रहावं वाटत होतं, त्यांना मिलच्या गेटवर तुफान मारहाण करुन पिटाळून लावलं जायचं. अंतिमतः त्या संपाचं काय झालं ते सर्वश्रूत आहे. आज त्या मिलच्या जमिनींवर टोलेजंग इमारती, शाॅपिंग माॅल्स उभे राहिलेत. ज्या लालबाग, परळ, लोअरपरळ, वरळी पट्टयाला गिरणगाव म्हटलं जायचं, तो सर्व भाग आता "शांघाय" बनण्याच्या मार्गावर आहे. किंबहुना हळूहळू तिकडे मार्गक्रमणा करीत आहे. १९८० च्या दशकातील गिरणी संपाचं सद्यस्थितीतील एसटी संप हे दृश्यरुप आहे. यातही राजकीय रस्सीखेचीत निम्नवर्गातील एसटी कर्मचारी भरडला जातोय. याचं भान ना राजकारण्यांना ना स्वतः कर्मचार्यांना आहे. सगळा अहंकार व स्वार्थाचा खेळ चाललाय. पडळकर, खोत, दरेकरांनी एसटी संपाचा बॅटन आता सदावर्तेंकडे सरकवलाय आणि ते देखील राणा भीमदेव थाटात गर्जना करत आहेत. त्यातून निष्पन्न काहीच होताना दिसत नाहीए. विरोधी पक्षनेते आपापल्या राजकीय पोळ्यां भाजण्यासाठी तासून बसलाय हे बस कर्मचारी आणि महामंडळाला समजत नाही हे नवलच आहे. मधल्यामध्ये राजकीय पोळ्या मात्र खरपूस भाजल्या जात आहेत. बरं यातून एसटी कर्मचार्यांचंही काही भलं होईलसं दिसत नाहीए. बहुसंख्य एसटी संपकरी व नेते बहुजन समाजातील आहेत आणि या संपाला धग देणारे आपापल्या गढीत बसून संभाव्य राजकारणात काही उलथापालथ होतेय किंवा नाही, याकडे चातकासारखे डोळे लावून बसले आहेत. इतिहासावरून कोणीच काही शिकले नाही , ना राजकारणी ना सतत होरपळणारी जनता. भांडवलदार सतत श्रीमंत होणार आणि जनता या मूर्ख राजकारण्यांच्या मागे लागून पुन्हा अजून जुना इतिहास रेखाटणार.. इगो बाजूला ठेवा कामावर रुजू व्हा आणि संघर्ष करा. जी चूक मिल कामगारांनी केली ती करू नका रे. एसटी संपामागून वेगळाच डाव रंगतोय, याची सुतराम शंका कर्मचार्यांना येऊ नये म्हणजे नवल आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाने सुध्दा एसटी कर्मचार्यांच्या हिताचे निर्णय घेऊन संप लवकरात लवकर कसा मिटवता येईल ते पहावं. या संपामुळे सर्वसामान्यांची आर्थिक ओढाताण होतेय.
सरतेशेवटी काय तर संप मिटल्यास लालपरी पुन्हा रस्त्यावर धावू लागेल आणि लोकांची गैरसोय पण संपेल.
N_D_PATIL_15








