माहेरचा आहेर… काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचा मुखभंग झाला असून, इटालीयन न्याययंत्रणेनेच ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात लाच घेतल्याप्रकरणी निकाल दिल्याने त्यांची भलतीच पंचाईत झालेली आहे. नॅशनल हेराल्डप्रकरणातील भ्रष्टाचार भाजपाने जनतेसमोर उघड केल्यानंतर हा राजकीय हेतूने प्रेरित आरोप असल्याचा दावा काँग्रेसने तत्परतेने केला होता. मात्र, आता सोनियांच्या माहेरील इटलीतील न्यायसंस्थेनेच भ्रष्टाचार झाल्याचे ताशेरे ओढल्याने, तसेच यात पाच हिंदुस्थानी नेत्यांना लाच दिली गेली असल्याचे म्हटल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे. आपण या आरोपांनी घाबरलेले नाही, असे सोनियांनी लगेचच सांगितले असले, तरी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी, हेलिकॉप्टर खरेदी सौद्यात लाच कोणाला मिळाली, हे सोनियांनी सांगावेच, असे आव्हान त्यांना दिले आहे. या प्रकरणात लाच देणारे इटलीतील तुरुंगात आहेत, पण लाच घेणारे कोठे आहेत? त्यावेळी सत्तेत असणारेच या गोष्टींना जबाबदार आहेत आणि त्यांनी देशातील जनतेसमोर सत्य परिस्थिती मांडलीच पाहिजे, अशा शब्दांत अमित शाह यांनी काँग्रेसचा समाचार घेतला आहे. मी कोणालाही घाबरत नाही, असे सोनियांनी म्हटले आहे. त्याचाही शाह यांनी समाचार घेतला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरण उघड झाल्यानंतरही तुम्ही कोणाला घाबरला नव्हता, ऑगस्ट वेस्टलँड प्रकरणानंतरही तुम्ही घाबरलेल्या नाहीत. आम्ही भाजपा सदस्य मात्र घटनेला, त्यातील नियमांना आणि सार्वजनिक निकषांना घाबरतो, असे सोनियांना खडे बोल सुनावले आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आल्यानंतर भ्रष्टाचाराचा एकही आरोप त्यांच्यावर दोन वर्षांच्या कार्यकाळात झालेला नाही. काँग्रेसमुक्त भारत ही लोकसभेवेळी दिलेली भाजपाने घोषणा प्रत्यक्षात येऊ लागलेली आहे. विधानसभा निवडणुकांत भाजपाला अपेक्षित यश मिळालेले नसले, तरी काँग्रेसची मतांची टक्केवारी लक्षणीय घटली आहे, तर भाजपाचा जनाधार वाढलेला आहे. काँग्रेसी कालावधीत टू-जी, कोलगेट, राष्ट्रकूल असे कोट्यावधींचे घोटाळे उघड झालेच, त्यानंतरही भाजपा सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात केलेली पापे बाहेर येऊ लागलेली आहेत. काँग्रेसी भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगणारे आणि राज्यसभेचे नवनिर्वाचित सदस्य डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सलग दुसऱ्या दिवशी राज्यसभेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. अपुऱ्या संख्याबळामुळे इतके दिवस विरोधक सत्ताधारी भाजपाची कोंडी करत होते. मात्र, सलग दोन दिवस डॉ. स्वामी यांनी काँग्रेस तसेच सोनिया यांच्यावर घणाघाती हल्ला केला. त्यामुळे पहिल्यांदाच काँग्रेस हतबल झाल्याचे संपूर्ण देशाने पाहिले. राज्यसभेतील काँग्रेसी नेत्यांनी तर पीठासीन अधिकाऱ्यांजवळ डॉ. स्वामी यांची तक्रार करण्याचा बालिशपणा केला. काँग्रेससह विरोधक हौद्यात उतरत सदनाला वेठीला धरतात, हे कोणत्या संसदीय परंपरेत मोडते? मात्र, डॉ. स्वामी यांनी सोनियांच्या माहेरचा केलेला उल्लेख मात्र यांना संसदीय परंपरा मोडणारा वाटतो. अर्थात, काँग्रेसला नमते घ्यावे लागले, हेच डॉ. स्वामी यांचे मोठे यश आहे. अरे ला, का रे, अशी विचारणा राज्यसभेत पहिल्यांदाच झाली, आणि त्यावर काँग्रेसने पळ काढावा, हे चित्रच काँग्रेसची मनःस्थिती दाखवणारे ठरले आहे. इटलीतील न्यायालयाने ऑगस्टा वेस्टलँडची गंभीर दखल घेत, त्यावर तत्परतेने निकाल दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधानांशी अमेरिकेत भेट घेऊन, याप्रश्नी दबाव आणला, असा धादांत खोटा आरोपही काँग्रेसने केला आहे. त्याचवेळी भाजपा सरकार सत्तेत येऊन दोन वर्षे झाली, त्यांनी आजवर याची चौकशी का केली नाही? असे निलाजरेपणाने विचारण्यासही काँग्रेसने मागेपुढे पाहिलेले नाही. मात्र, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर लवकरच संसदेच्या सभागृहात याबाबत सविस्तर निवेदन देणार आहेत. त्यावेळी भाजपा सरकारने नेमक्या कोणत्या उपाययोजना राबवल्या हे स्पष्ट होणारच आहे. काँग्रेसी भ्रष्टाचार हा काही देशाला नवा नाही. त्यामुळे आणखी एक काँग्रेसी भष्ट्राचार असेच याकडे आम्ही पाहतो. मात्र, ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणातून पुढे आलेली गंभीर बाब म्हणजे हे प्रकरण दाबण्यासाठी दिल्लीतील काही पत्रकारांना करोडो रुपयांची खिरापत कंपनीने वाटलेली आहे. त्यांची नावे जरी आज उघड झालेली नसली, तरी चौकशीअंती ती पुढे येतीलच. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला नख लावणाऱ्या या अपप्रवृत्तींचा त्यामुळेच आम्ही निषेध करतो आहोत. सातत्याने भाजपाविरोधात वार्तांकन करणाऱ्या माध्यमांनी विश्वासार्हता केव्हाच गमावलेली आहे. नर्मदा सरोवर प्रकल्पावेळीही त्याला होणारा विरोध हा स्वार्थापोटी करण्यात आल्या असल्याचे उघड झाले होते. मात्र, भ्रष्टाचारासारखी प्रकरणे दडपून टाकण्यासाठी माध्यम प्रतिनिधींचे तोंड अशा पद्धतीने बंद करण्यात येत असेल, तर काय बोलणार... त्याचवेळी हवाई दलाच्या मुख्यालयातून काही संवेदनशील माहिती ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला फॅक्समार्फत पाठवण्यात आली असल्याचे उघडकीस आले आहे. देशाच्या सुरक्षिततेचा विचार केला, तर ही गंभीर बाब आहे. हवाई दलातील देशविरोधी कारवाई करणारा तो अपराधी लवकरात लवकर गजाआड जाणे, ही काळाची गरज आहे. बाकी, ऑगस्टा वेस्टलँडमधील जे कोण पाच नेते आहेत, त्यांची नावे चौकशीअंती जाहीर होतीलच. त्यांना अटक होईल, जामीनावर सुटकाही होईल. कायद्यानुसार जे काही व्हायचे आहे, ते सर्व काही होईल. सध्यातरी काँग्रेस दहा पावले मागे गेलेली आहे, इतके मात्र नक्कीच. संजीव ओक