औरंगाबाद - श्रीराम म्युझिकल फाउंडेशन (S.M.F.) तर्फे आयोजित “गानवेद” या २१ शास्त्रीय संगीत सभांमधील दुसरी मैफिल आज रंगली. श्री. गजानन केचे आणि पं. शुभदा पराडकर यांनी केलेल्या रंजक सादरीकरणाने श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला.
पटदीप रागातील “एरी मोहे जाने दे” या विलंबित एकतालातील बहारदार रचनेसह श्री. केचे यांनी श्रोत्यांना भक्तीसागरात सचैल रिझविले. आलापितील रसाळता आणि तानांमधील गांभीर्य यातून त्यांनी सुरेख स्वरशिल्प उभे केले. “भेटी लागी पंढरीनाथा ” ही संत तुकारामांची रचना त्यांनी गायली. त्यांना हार्मोनिअमवर श्री. संतोष केचे तर तबल्यावर सुजीत नेवपूरकर यांनी यथोचित साथसंगत केली. तानपुऱ्यावर आशिष तांबे आणि राहुल आघाडे यांनी साथ केली.
पं. शुभदा पराडकर यांनी खास ग्वाल्हेर गायकीचा अभिनव अनुभव देत आणि आग्रा घराण्याच्या नोमतोम पद्धतीच्या स्वरविस्ताराने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. घरंदाज गायकीसह रंजक, सुरेख आलापी तसेच लांब पल्ल्याच्या दमसासयुक्त ताना अशी उत्तरोत्तर मैफिल रंगत गेली. श्री रागातील “हो गरीब नवाज” ही झपतालातील बंदिश तसेच “चलो रि माई रामसिया दरसन” ही द्रुत तीनतालातील बंदिश गात त्यांनी रसिकांना तृप्त केले. “गानवेद” च्या या आगळ्या मैफिलीचे स्वरअवकाश पं. शुभदा पराडकर यांच्या स्वरचांदण्याने उजळून निघाले. आलापितील स्वर आर्जव आणि तानांमधील वादी स्वरांवरील ठहरावांचे त्यांचे औदार्य अद्वितीय होते. सुरेल असा तराना तसेच टप्प्यानंतर भैरवी गाऊन त्यांनी मैफिलीची सांगता केली. त्यांना तबल्यावर श्री. दत्ता गोगटे तसेच हार्मोनिअमवर श्री. सतीश पराडकर यांनी सुरेख साथसंगत केली. तसेच तानपुऱ्यावर मानसी कुलकर्णी व सौ. आडगावकर यांनी साथ केली.
मैफिलीचे सूत्रसंचालन सायली पांडे यांनी केले. शहरातील तमाम प्रथितयश संगीततज्ज्ञ आणि विद्यार्थी तसेच रसिक “गानवेद” च्या या दुसऱ्या संगीत मैफिलीला उपस्थित होते.
S.M.F. च्या ‘गानवेद’मध्ये पं. शुभदा पराडकर यांच्या श्री रागाने उजळला आसमंत औरंगाबाद - श्रीराम म्युझिकल फाउंडेशन (S.M.F.) तर्फे आयोजित “गानवेद” या २१ शास्त्रीय संगीत सभांमधील दुसरी मैफिल आज रंगली.








