मी लेखक नव्हे !
मी काही लेखक नाहीये, तरीही गेल्या काही दिवसांपासून माझ्यात लिहिण्याचा किडा वळवळतोय. कित्येकदा लॅपटॉप घेऊन बसतो, पण काही सुचत नाही. जेंव्हा सुचतं तेंव्हा लिहण्यासाठी जवळ काही साधन नसतं. सुरवातीला जेंव्हा लिहिण्याचं ठरविले तेंव्हा वाटलं, हे तर खूप सोप्प आहे. एखादा ग्रंथ हा हा म्हणता असा लिहून काढेल मी, पण नंतर समजलं कल्पना आणि वास्तव यात खूप फरक असतो. कल्पनेत आपण ठरवितो कि, अमुक गोष्ट मी झटक्यात करील, तमुक गोष्ट करणे तर माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. असेच आणि बरचं काही. वास्तवात आल्यानंतर मात्र आपल्याला, हा सूर्य आणि हा जयद्रथ कुणी दुसऱ्यांनी सांगायची गरज पडत नाही. ते आपणहूनचं समजते. कधी-कधी मला प्रश्न पडतो. हे बाकीचे मोठ मोठे लेखक कसे काय लिहित असतील इतकं भरमसाट. केव्हढी मेहनत घेत असतील, किती संयम ठेवावा लागत असेल, म्हणजे एका जागेवर दीर्घकाळ बसून रहायचं, पाठीची, पोटाची, हातांची कसलीच तमा बाळगायची नाही. अर्थात हे सगळे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय. माझ्याबाबतीत शक्यतो असेच होते. बाकीच्या लेखकांच्या बाबतीतही असेच होत असणार असं माझं अंतर्मन मला सांगतंय. शिवाय इतकं सगळं लिहिण्यासाठी एकांतवासाची खूप गरज पडते. गोंगाटात तर लिहिणं शक्य नाही.
मला तर चार ओळी लिहिण्यासाठी कित्येक तास लागतात, आता एखादं अतिहुशार व्यक्तिमत्व म्हणेल कि, तुम्हाला काही सुचत नसेल म्हणून इतका वेळ लागत असेल. तस पाहिलं तर हे म्हणणं साफ नाकारता येणार नाही, परंतु हे पूर्णसत्य नाही. लिहिण्यास वेळ लागतो त्यास कारण म्हणजे, एका ओळी नंतर स्वयंपाक घरातून आवाज येतो, अहो! जेवणासाठी भाजी काय करू? आता मी इथे एका महान कलाकृतीला जन्म देत असतांना मला सौभाग्यवतीला हे हि सांगावं लागतं कि जेवणासाठी कुठली भाजी करायची आहे.
माझी विचारशृंखला इथे कमकुवत न होऊ देता मी सांगतो, कर कुठलीही! तू करशील ती भाजी खाईल मी आवडीने. एखाद्यास वाटेलं कि वाह! काय प्रेम आहे याचं सौ वरती. पण मला मात्र लिखाणात व्यत्यय नको म्हणून मी आपले म्हटले.
तुम्ही खातालं हो, पण मला सुचत नाहीये काय भाजी करू ते. त्रासिक सुरात सौ बोलून जाते. बघा सौ नां सुद्धा आमच्या बोलण्यात प्रेम दिसत नाही. तसं असतं तर तिने इश्श बिश्य काही तरी म्हणायला हवं होतं ना.
असं होय, काय आहे भाजी करायला घरात? मी लिहिण्यासाठी दुसऱ्या ओळीला सुरुवात करता करता तिला विचारतो. नेमकी अशावेळी भाजीला घरात काही नसते. मग काय दुसऱ्या ओळीची सुरुवात बाजूस ठेऊन मजला भाजी विकत आणण्याच्या कामगिरीस जाणे भाग पडते. तश्या आमच्या सौ इतर वेळी भाज्यांचा मुबलक साठा करून ठेवत असतात पण निव्वळ योगा योगाने ज्या दिवशी मी लिहिण्यास बसावं म्हणतो तेंव्हा घरातील काही अत्यावश्यक गोष्टी संपूस्ट पावतात आणि मग मला माझे लिखाण कार्य अर्धवट ठेवून आधी घरातील किरकोळ कामगिऱ्या फत्ते कराव्या लागतात आणि जेंव्हा परत येऊन लिहिण्यास बसतो तेंव्हापर्यंत माझी विचारशृंखला तुटलेली असते, ती परत जोडण्याचे प्रयत्न चालू असतात तोच,
आता जेवण करून घ्या बरं, बसले ते लॅपटॉप घेऊन परत, नंतर लिहा ती तुमची अजरामर कलाकृती, जसं काही सर्व जग वाट पाहतंय तुम्ही काय लिहणार आहात याची. सौभाग्यवती आज्ञा सोडतात.
निमुटपणे लॅपटॉप बाजूला ठेऊन, जेवणाच्या ताटा समोर जाऊन बसावे लागते. जेवतांनाही हल्ली डोक्यात विचार चक्र सुरु राहते. पुष्कळ गोष्टी आहेत लिहिण्यासारख्या पण कोणत्या गोष्टी पासून सुरुवात करावी याची उकल काही होत नाही. आयुष्यात अनेक प्रसंग येऊन गेले आहेत चांगले आणि वाईटही. तरीही आत्मकथा वगैरे लिहिण्याचे अजून माझे काही वय नाही. ते लिहू नंतर सावकाश. सध्या काहीतरी काल्पनिक लिहिले पाहिजे असे राहून राहून वाटते. आटपाट नगर, राजा आणि राणीच्या गोष्टी कित्तेकांनी लिहिल्या आहेत. तेच तेच नको वाटतं आता. प्रवासवर्णन लिहणे कदाचित बरं राहील. निदान या निमित्ताने तरी कुठे तरी भटकंती करायला मिळेल. चांगली १५ दिवस सुट्टीच घेतो ऑफिसातून. कुणी विचारलेच तर सांगेल प्रवासवर्णन लिहायचे आहे त्यासाठी थोडा प्रवास करून येतो, अर्थात असे कारण सांगून सुट्टी मिळणार तर नाहीच, पण काय हरकत आहे या कामासाठी सुट्टी देण्यास. लोक कधी कधी फालतू कारणासाठी दोन दोन दिवस सुट्टी घेतात तेंव्हा बरं दिली जाते यांना सुट्टी. दूर कशाला अगदी मागच्याच आठवड्यात माझ्या ऑफिसमधल्या एकाने कोणत्या कारणासाठी सुट्टी घ्यावी तर म्हणे याने वडा पाव सोबतच पाव खाल्ला, नुसता पाव आणि याच्या पोटात दुखतंय म्हणून चक्क दोन दिवस सुट्टी घेतली. लोक फोन करतायत तर फोन सुद्धा घेतला नाही पठ्याने कुणाचा. तो नंतर ऑफिसात आल्यावर मॅनेजरने सक्त ताकीदचं देऊन टाकली त्याला कि काही झाले तरी तू यापुढे कामाच्या दिवशी पाव खायचा नाही. सुट्टीच्या दिवशी काय खायचे तेवढे खा.
जर अशा कारणाला दोन दिवस सुट्टी मिळत असेल तर याच्या तुलनेत माझा हेतू किती तरी उदात्त आहे. मला १५ दिवस आरामात सुट्टी मिळेल. त्यातल्या त्यात माझ्या मॅनेजरला पण लिखाणाची आवड आहे त्यामुळे मला जास्त चिंता करण्याचे कारण नाही. कुठे तरी तीर्थस्थळी जाऊन लिखाणास सुरुवात करावी, गोवा अतिशय उत्तम ठिकाण राहील, असं माझ्या आतला लेखक मला सांगतोय. कित्येक लेखकांना या तीर्थक्षेत्रात लिहिण्यासाठी पुष्कळ विचार आणि उर्जा मिळते. असं मी कुठे तरी वाचलंय, आता ते अनुभवण्यासाठी मी ही जाऊन येतो आणि आल्याबरोबर प्रवासवर्णन लिहिण्यास प्रारंभ करतो. तोपर्यंत तुम्ही जरा उन्हा पासून स्वतःची काळजी घ्या आणि खूप पाणी प्या.
See you soon…
















