वाइल्ड... पदभ्रमंतीतून `स्व’चा शोध
ऑस्कर चित्रपट रसास्वाद...
वाइल्ड.... पदभ्रमंतीतून `स्व'चा शोध
आपण जे अपेक्षित करतो, त्यासाठी तरी आपण कुठे तयार असतो का, या एका केंद्रबिंदूशी
जीन-मार्क व्हॅली दिग्दर्शित `वाइल्ड' सिनेमा आपल्याला फिरवत राहतो. सध्याच्या
गुंतागुंतीच्या, व्यस्त, बाजारू आयुष्यात दररोज निराशात्मक करणाऱया अनेक घटनांना
तुम्ही-आम्ही सामोरे जात असतो. त्याला तोंड देण्याची प्रत्येकाचीच तयारी असते असे
नाही. त्यातूनच what if ही विचारांची मालिका सुरू होते. तशी ती `वाइल्ड'मधील
चेरील स्ट्रेयडच्या आयुष्यात सुरू होते. जिवापाड प्रेम असणारी आई- बॉबी- कर्करोगाने
वारलेली. त्यामुळे निराशाग्रस्त होऊन अंमलीपदार्थ्यांच्या नादी लागण्याच्या तयारीत
असेलली ही चेरील घटस्फोट घेते. आत्मसंवाद साधण्यासाठी, स्वचा शोध घेण्यासाठी आणि
आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पदभ्रमंतीचा मार्ग निवडते. अमेरिकेतल्या
कॅलिफॉर्निया आणि ऑरेगॉन राज्यांमध्ये पसरलेल्या पॅसिफिक क्रेस्ट ट्रेल अर्थात पीसीटीवर
ती १८०० किलोमीटरची अनुभव नसताना पदभ्रमंती करण्याचा धाडसी निर्णय घेते. भ्रमंती
सुरू होते. तिच्याकडे इतके सामान असते, की ते तिला उचलताही येत नाही. परंतु, तिच्या
मनाचा निश्चय दृढ झालेला असल्याने ती भ्रमंतीची बॅकपॅक उचलतेच. हीच चित्रपटाचीच
सुरवात. तेथून पुढे ११५ मिनिटांचा तिच्याबरोबरचा आपला प्रवास म्हणजे आपण आपल्या
स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न ठरावा.
चेरीलची ही पदभ्रमंती १९९५मधील. तब्बल ९५ दिवस सुरू होती. पदभ्रमंतीच्या ५८ व्या
दिवशी पाण्यासाठी चेरीलची कासावीस सुरू होते. कुठेही पाणी नाही. अखेर स्वतःच्याच
राहुटीवरील पाण्याचे दव चाटून ती तहान भागवते. अशा येणाऱया प्रत्येक अडचणीतून ती
दमदारपणे मार्ग काढते... तिच्या आईसारखाच. एका नवीन आयुष्याचा अनुभव घेत पुढे
सरकत राहते. भ्रमंतीदरम्यान फ्लॅशबॅकच्या रुपात आपल्याला तिचं पूर्वसूरीचं आयुष्य
उलगडू लागतं. त्यातून तिचे आईशी असलेले भावनिक पदर उलगडले जातात. स्वयंपाक
करताना आनंदगाणं गुणगुणणाऱया आईवर चेरील ओरडते. मारहाण करणाऱया, दारूड्या
बापामुळे किती हाल होत आहेत, याची तिला आठवण करून देते. त्यावर तिची आई उत्तर
देते... ठीक आहे. तुझ्यासारखी चांगली मुलगी, चांगला मुलगा मला त्याच्यामुळे मिळालं,
हे काही कमी आहे का? या उत्तरानं चेरील निरुत्तर होते.
पदभ्रमंतीमध्ये तिला अनोळखी भ्रमंती करणाऱे भेटतात. ऊन, वारा, पाऊस सुरू असताना
हा प्रवास सुरू असतो. अस्ताव्यस्त पसरलेल्या जंगलामध्ये सर्व पुरुष भ्रमंतीकार आणि
केवळ चेरीलच स्त्री असते, हे ज्यावेळी तिच्या लक्षात येते, त्यावेळी ती गडबडते. परंतु, या
मनोवस्थेमधूनही ती धीरगंभीरपणे बाहेर पडते. मनाला उत्फल्ल करणारेही प्रसंगी चेरील
अनुभवते. त्यावेळी होणारी तिची अवस्था पाहण्यासारखीच आहे. पदभ्रमंतीच्या शेवटच्या
टप्प्यात तिची एका आजीबरोबर निघालेल्या मुलाशी भेट होते. दोघे छान गप्पा मारतात.
गप्पांच्या ओघात आई वारल्याचं चेरील त्याला सांगते. त्यावर मुलगा त्याची आई त्याला
गाऊन दाखवत असलले लोकगीत म्हणून दाखवतो...
From this valley they say you are leaving.
We shall miss your bright eyes and sweet
smile,
For you take with you all of the sunshine
That has brightened our pathway a while.
Then come sit by my side if you love me.
Do not hasten to bid me adieu.
Just remember the Red River Valley,
And the cowboy that has loved you so true.
या लोकगीतानं चेरीलच्या मनात आईच्या आठवणी जाग्या होतात. ती भावनावश होते.
तिला रडू कोसळते. जीवन असह्य वाटू लागते. आईच्या आठवणींनी व्याकूळ झालेली
चेरील वॉशिग्टनमधील कोलंबिया नदीवरील ब्रिज ऑफ द गॉडस वर येते. ९४ दिवसांच्या
पदभ्रमंतीनंतर ती आपला प्रवास थांबवते. या सबंध भ्रमंतीदरम्यान लाल कोल्हा तिला
दिसतो. हा कोल्हा म्हणजे आपली प्रतिनिधीक आई आहे, असा चेरीलचा ग्रह होतो.
त्याच्या माध्यमातून आई आपल्यावर लक्ष ठेवून असल्याचं सारखं तिला वाटत राहतं.
प्रवास थांबवताना ती स्वतःशी बोलायला लागते... विचारमग्न, आत्ममग्न होते... what
if प्रश्नांची मालिका तिच्या मनात सुरू असतानाच, अपेक्षित गोष्टींसाठी आपण कधीच
तयार नसतो, असंही तिच्या मनात येतं. त्यातून एक सकारात्मक विचार तिच्या मनात
घोळू लागतात... आई गेली. मी स्वतःला स्वतःच्याच दुःखात गुरफटून घेतलं. मला आता
भ्रमंतीदरम्यान जंगलातून नवा रस्ता मिळाला आहे. आता पुढचा प्रवास कसा असेल,
याचीही मला कल्पना नाही. मला भ्रमंतीनं नक्की काय दिलं? अजूनही कळायचं काय बाकी
आहे? मी आता चार वर्षानंतर लग्न करेल. त्यानंतर पाच वर्षांत आम्हाला मुलगा होईल.
त्यानंतर वर्षानं एका मुलीची मी आई होईल. या पदभ्रमंतीमुळे मी खाली हातानं परतत
नाहीए. आयुष्य जगायचं. हे ती सांगत असतानाच आपण तिच्या पुढच्या आयुष्याची
आपल्या मनात पेरणी करत राहतो...
if i could या गाण्यातून सतत चेरीलच्या आईच्या आठवणी जाग्या ठेवण्याचे
काम करते. यातून चेरीलची आई चित्रपटभर चेरीलसह आपल्याही बॅक ऑफ द माइंड
अंतर्मनात अस्तित्व जाणवत राहते. चित्रपटभर चेरीलने शारीरिक आणि मानसिकतेची
चांगली पेरणी आपल्या अभिनयातून व्यक्त केली आहे. तुम्ही भावनिकरित्या चेरीलशी
जोडले जाता. रिस व्हिदरस्पून या दमदार अभिनेत्रीने चेरील सशक्तपणे उभी केली आहे,
तर लॉरी डर्न यांनी चेरीलच्या आईची-बॉबीची भूमिका वठवली आहे. रिस आणि लॉरी या
दोघींनाही या चित्रपटातील अभिनयासाठी ऑस्कर नामांकन मिळाले होते.
पीसीटीवरून जाताना पिवळ्या गवतातून निघालेली चेरील कोणालाच विसरता येणार नाही.
विहंगम दृश्यात पिवळ्या गवतामध्ये निळ्या बॅकपॅक घेऊन चाललेली चेरील तेथील
दिसणाऱाय रंगसंगतीमुळे कायचीच लक्षात राहते. ही दिग्दर्शकाची सौंदर्यदृष्टी आपल्या
नजरेतून सुटत नाही. चेरील स्ट्रेयड यांनी लिहिलेल्या `वाइल्ड : फ्राॅम लॉस्ट टू फाउंड
ऑन द पॅसिफिक क्रेस्ट ट्रेल' या पुस्तकावर आधारित या चित्रपटाची निर्मिती आपल्याला
कोठेही निराश करीत नाही, हे नक्की.